Mumbai Pune Missing Link Project Pudhari
पिंपरी चिंचवड

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक अंतिम टप्प्यात; 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला होणार

30 मिनिटांचा वेळ वाचणार; अत्याधुनिक बोगदे व पूलामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार मानला जाणारा मिसिंग लिंक प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या 1 मेपासून (महाराष्ट्र दिन) हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असून, त्यादृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ तब्बल 30 मिनिटांनी कमी होणार आहे.

घाटातील मिसिंग कनेक्टिव्हिटी आता पूर्ण

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधताना लोणावळा घाट परिसरातील कठीण भूप्रदेश, तीव उतार, तीक्ष्ण वळणे आणि दाट धुके यामुळे एक महत्त्वाचा भाग थेट जोडता आला नव्हता. ही मिसिंग राहिलेली कनेक्टिव्हिटी आता पूर्ण झाली असून, यामुळे खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि वाहतूक कोंडीचा त्रास कायमचा दूर होणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्‌‍ये आणि जागतिक विक्रम

  • देशातील सर्वात लांब बोगदा : या प्रकल्पात एकूण दोन बोगदे असून, त्यातील 9 किमी लांबीचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे.

  • सर्वांत रुंद बोगदा : 23.5 मीटर रुंदीचा हा बोगदा जगातील सर्वांत रुंद बोगद्यांपैकी एक आहे. हा संपूर्ण मार्ग आठ पदरी असणार आहे.

  • उंच पूल : प्रकल्पांतर्गत 185 मीटर उंचीचा एक भव्य पूल बांधण्यात आला आहे. तर, 150 मीटर उंचीचा केबल-स्टेड पूल अभियांत्रिकी कौशल्याचा अप्रतिम नमुना ठरला आहे.

  • वेळ आणि इंधनाची बचत : या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर 6 किलोमीटरने कमी होईल, ज्यामुळे दररोज प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचेल आणि सुमारे 1 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल.

सुरक्षेसाठी अत्याधुनिक स्मार्ट यंत्रणा

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या बोगद्यात जागतिक दर्जाची तंत्रज्ञान प्रणाली बसवण्यात आली आहे: स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. बोगद्यात आग लागल्यास भिंतीमधील सेन्सर्स तात्काळ सक्रिय होतील आणि वॉटर मिस्टच्या माध्यमातून उच्च दाबाने पाणी फवारून आग विझवली जाईल.

हवेच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात येणार

हवेच्या गुणवत्तेवर लक्ष देण्यात आले आहे. बोगद्यातील कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांसारख्या विषारी वायूंचे रिअल-टाइम निरीक्षण केले जाणार आहे. लिनियर हिट डिटेक्शन यंत्रणेद्वारे बोगद्यातील तापमानावर नियंत्रण ठेवले जाईल आणि वातावरण थंड ठेवण्यासाठी ठराविक अंतरावर पाण्याची फवारणी केली जाईल.

डिजिटल सूचना फलक

वाहनचालकांना मार्गदर्शन आणि सूचना देण्यासाठी संपूर्ण मार्गावर जागोजागी डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत उभारलेला हा प्रकल्प केवळ एक शॉर्टकट नसून, आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीचे आणि सुरक्षित प्रवासाचे प्रतीक ठरणार आहे. सध्या मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले असून, तो मुख्य मार्गाला जोडणाऱ्या भागातील दुरुस्तीची कामेही अंतिम टप्प्यात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT