

पिंपरी: आरटीई प्रवेशासाठीची लॉटरी 10 एप्रिल रोजी काढण्यात आली असून, कागदपत्र तपासणीला सुरुवातही करण्यात आली आहे; मात्र महापालिकेच्या शिक्षण विभागातील नियोजनशून्य कारभारामुळे पालकांची मोठी फरपट होत आहे. सुरुवातीला कागदपत्रे तपासणी समिती गठीत न करता फक्त कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. आता तपासणीसाठी वारंवार फेऱ्या मारुन पालक त्रस्त झाले आहेत.
तपासणी जागेवरच पूर्ण न करता पालकांना ‘दोन-तीन दिवसांनी या, पावती घेऊन जा’ असे सांगितले जात असल्याने, कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना पालकांत वाढू लागली आहे. प्रवेशाच्या मुदतीत अशा वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत.
कागदपत्र पडताळणीची मुदत 20 एप्रिलपर्यंत आहे. कागदपत्र तपासणीशिवाय शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. कमी मुदतीत पालकांना कागदपत्रातील त्रुटी आणि दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळू शकणार नाही. तसेच पडताळणीसाठी काही पालकांना शेवटच्या दिवसाचे टोकन देण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी कागदपत्र पडताळणीमध्ये काही त्रुटी राहिल्यास त्याचा फटका थेट पालकांना बसणार आहे.
आम्ही कागदपत्र पडताळणीसाठी पालकांना टोकन दिले आहेत. संबंधित तारखेदिवशी पालकांनी कागदपत्र पडताळणीसाठी यावे. कागदपत्रामध्ये काही त्रुटी असल्यास पालकांना फोन करून बोलावले जात आहे.
संगीता बांगर ( प्रशासन अधिकारी, पिं.चिं.मनपा शिक्षण विभाग)
कागदपत्र पडताळणीसाठी टोकन देतात आणि संबंधित दिवशी या असे सांगितले जाते; परंतु कागदपत्रे जमा करण्याची 20 एप्रिल शेवटची मुदत आहे. अनेक पालकांना कागदपत्रे पडताळणीसाठी 20 एप्रिल तारीख दिली आहे. त्यामुळे पालकांना कागदपत्रे दुरुस्तीसाठी वेळच मिळणार नाही. यावरून पालिका शिक्षण विभागाचा गलथानपणा सुरु असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. शरद जावडेकर (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा)