Guns Pudhari
पिंपरी चिंचवड

Mulshi Firing Incident: मुळशीतील माण गावच्या यात्रेत गोळीबार; दहशत निर्माण, एकाला अटक

किरकोळ वादातून तरुणाने हवेत तीन राउंड फायर; हिंजवडी पोलिसांची तातडीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मुळशी तालुक्यातील माण गावातील यात्रेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने हवेत तीन राउंड फायर करत दहशत निर्माण केली. ही घटना रविवार (दि. 19) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास भोईरवाडी येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.

मयूर काळुराम भोईर, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह तानाजी हनुमंत काखनाळे, दत्तात्रय गुलाब भोईर, पांडुरंग गुलाब भोईर (सर्व रा. भोईरवाडी, माण, ता. मुळशी) आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुकाराम नाथू भोईर (55, रा. भोईरवाडी, माण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील माण गावची यात्रा सुरू होती. रविवारी गावात यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री नऊ वाजताच्या सुमारास भोईरवाडी येथील दत्त मंदिरासमोर तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना तानाजी काखनाळे हा स्टेजजवळ उभा राहून नाचत धिंगाणा घालत होता. त्यामुळे गावचे माजी पोलिस पाटील असलेले फिर्यादी तुकाराम भोईर त्याला समजावून सांगण्यासाठी गेले.

या वेळी तानाजी काखनाळे याने तुकाराम भोईर यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि तेथून निघून गेला. त्यानंतर रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तुकाराम भोईर व त्यांचे नातेवाईक घरी जात असताना तानाजी राहत असलेल्या इमारतीजवळ आले. त्यांनी तानाजीचा घरमालक दत्तात्रय भोईर यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र दत्तात्रय भोईर यांनी तानाजीला समजावून सांगण्याऐवजी फिर्यादींसोबतच वाद घालत भांडणास सुरुवात केली.

या वेळी दत्तात्रय भोईर व तुकाराम भोईर यांच्या गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की व मारामारी सुरू झाली. परिस्थिती चिघळत असताना दत्तात्रय भोईर याच्यासोबत असलेल्या मयूर भोईर याने त्याच्याकडील पिस्तूल काढून हवेत तीन राउंड फायर केले. पिस्तुलाच्या धाकाने तुकाराम भोईर व त्यांच्या सोबत असलेले लोक घाबरून तेथून निघून गेले.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयूर भोईर याला ताब्यात घेऊन अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT