Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Waste To Energy Accident: चौकशी समितीची धडक पाहणी; ३५ मुद्द्यांची माहिती मागवल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी तपास वेगात; एका महिन्यात प्राथमिक, दोन महिन्यांत अंतिम अहवाल

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळून 9 कर्मचार्‍यांचा नाहक बळी गेला. त्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने नेमलेल्या समितीने शुक्रवारी (दि. 17) मोशी कचरा डेपोस भेट देऊन माहिती घेतली. समितीने महापालिकेकडे 35 मुद्द्यांची माहिती मागितली आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात 8 जुलैला दुपारी दीडच्या सुमारास दुर्घटना घडली. त्यात वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील 9 कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्यीय समिती 13 जुलैला स्थापन केली होती.

समितीच्या अध्यक्षा पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, मुंबईतील आयआयटीचे प्रा. डी. एन. सिंग, पर्यावरण व घनकचरा विषयातील तज्ज्ञ प्रा. अनिलकुमार दीक्षित, समिती सचिव सदस्य महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे तसेच, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिका अधिकाऱ्र्यांचे धाबे दणाणले

समितीने कचरा डेपो, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प तसेच, दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी केली. त्यानंतर चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे त्यांची बैठक झाली. मोशी कचरा डेपो, वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग आदी तसेच, इतर कामांबाबचे सुमारे 35 मुद्याबाबतचे कागदपत्रे त्यांनी मागितले आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. समितीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी, बांधकाम परवानगी व इतर विभागाचे धाबे दणाणले आहेत.

एका महिन्यात देणार प्राथमिक अहवाल

वस्तुनिष्ठ, सखोल व तांत्रिक चौकशी करून दुर्घटनेस कारणीभूत असलेल्या बाबींची तपासणी करणे, जबाबदारी निश्चित करणे, तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. समितीने एका महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल देणार आहेत. तर, दोन महिन्यांत अंतिम चौकशी अहवाल सादर करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT