Golf Club Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Golf Course: मोशीतील ६१.३८ हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ क्लब; १० आरक्षणे बदलण्याचा प्रस्ताव

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव; मंजुरीनंतर हरकती-सूचना मागवून राज्य शासनाकडे पाठविणार प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी अभियंते, विदेशी व देशी उद्योगपती, अधिकारी, खेळाडू आणि नागरिक यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची गोल्फ कोर्स क्लबची सुविधा निर्माण केल्यास शहरात आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे, असा दावा करत मोशी येथील एकूण वेगवेगळे दहा आरक्षणे बदलून तेथील तब्बल 61.38 हेक्टर जागेत गोल्फ कोर्स करण्यात येणार आहे. त्यासाठी जुने आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास शहर पुण्यातील येरवडा येथील गोल्फ कोर्सप्रमाणे सुविधा शहरात उपलब्ध होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडी, माण, गहुंजे, मारुंजी, जांभे, नेरे, सांगवडे या नवीन सात गावांचा समावेश करण्यात येणार आहे. शहरात मोठ्या संख्येने आयटी उद्योगांचा समावेश होणार आहे. शहरात तळवडे येथे अनेक आयटी पार्क सुरू आहेत. शहरात विदेशी उद्योगपती तसेच, अधिकारी व नागरिक कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यामुळे शहरात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शहरात मेट्रो मार्गाचा विस्तार देखील सुरू आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरात गोल्फ कोर्स क्लबसारखी आंतरराष्ट्रीयस्तरावरील सुविधा विदेशी व स्थानिक नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील विविध आरक्षणांसाठी प्रयोजन असलेली पडिक जागा आहे. त्या जागेत कोणताही वापर सुरू झालेला नाही. त्या जागांवरील आरक्षणात फेरबदल करून गोल्फ कोर्स क्लब सुरू उपलब्ध होऊ शकते. शहरात ही सुत्तिधा उपलब्ध झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महापालिकेचे नाव होऊन शहरामद्ये विविध नव्याने उद्योगधंधे उभे राहण्यास चालना मिळेल. सद्यस्थितीमध्ये मोशी परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेशन सेंटर, आआयएम, न्यायालय, सीओईपी, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आदी प्रकल्पाचे कामकाम सुरू झाले आहे. तर, काहीचे प्रस्तावित आहे.

त्यामुळे मोशी येथील मंजूर विकास आराखड्यातील त्या जागा योग्य असून, त्या ठिकारी गोल्फ कोर्स क्लब निर्माण करण्याचा निर्णय त्य बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, मोशीतील गट क्रमांक 327, 435, 436, 437, 438, 439, 440, 441, 442, 443 या एकूण 61.38 हेक्टर जागांवरील विविध प्रकारचे दहा आरक्षण रद्द करून त्या सर्व जागेवर गोल्फ कोर्स क्लबचे आरक्षण प्रस्तावित करावे, असा आरक्षणातील फेरबदलाचा प्रस्ताव 15 ऑक्टोबरला होणार्‍या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. सभेने मंजुरी दिल्यानंतर गोल्फ कोर्स निर्मितीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

नव्या आरक्षणावर हरकती, सूचना मागणार

मोशी येथील मंजूर विकास योजनेतील आरक्षण वगळून गोल्फ कोर्स क्लब असे आक्षरण करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याबाबत वरील नियमानुसार फेरबदल प्रस्ताव तयार करण्यास सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात येत आहे. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागण्यात येणार आहे. त्यावर सुनावणी घेऊन तसा प्रस्ताव राज्य शासनाला मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. त्याचे सर्व अधिकारी आयुक्तांना प्रदान करण्यात येणार आहेत. दरम्यान, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा पुढील 50 वर्षांत आराखडा सादर करताना, जागतिक दर्जाचे गोल्फ क्लब आणि पीसीएमसी क्लब विकसित करण्याचा मनोदय जाहीर केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT