Maval Plastic Free Campaign Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Plastic Free Campaign: मावळमध्ये प्लास्टिकमुक्त अभियानाला मंजुरी

कचरा वर्गीकरण, सिंगल-यूज प्लास्टिक बंदीवर भर; पंचायत समितीचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: मावळ पंचायत समितीच्या बैठकीत प्लास्टिक व कचरामुक्त मावळ संकल्पना राबविण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. मावळ पंचायत समितीच्या माध्यमातून तालुकाभर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. गटनेते दिलीप ढोरे यांनी या संदर्भातील प्रस्ताव मांडला होता.

सभापती सुनीता येवले यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती साहेबराव कारके, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस गटनेते दिलीप ढोरे, सदस्य राजेंद्र कडलग, योगेश लोहर, समीर जाधव, प्राची गायकवाड, रेश्मा देवकर, शैला कालेकर, आशा मोरमारे व सर्व अधिकारी उपस्थित होते.

कचरा वर्गीकरणाचा अभाव

या वेळी तालुक्यात वाढत चाललेल्या प्लास्टिक व कचरा समस्येकडे गटनेते ढोरे यांनी लक्ष वेधले. मावळमधील वाढत्या प्लास्टिक वापरावर चिंता व्यक्त करून सिंगल-यूज प्लास्टिकचा वाढता वापर, कचरा वर्गीकरणाचा अभाव, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची सवय आणि नागरिकांमधील जागरूकतेचा अभाव यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांकडून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. विशेषतः ओढे, नदी, नाले यात राजरोसपणे कचरा फेकला जात आहे.

प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मातीची गुणवत्ता घटली

प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मातीची गुणवत्ता घटत असून, याचा शेतीवर परिणाम होत आहे. तसेच, नद्या, ओढे व जलस्रोत प्रदूषित होत असून, जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाऊन मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. तसेच, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढून पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे मावळचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन

या पार्श्वभूमीवर सिंगल-यूज प्लास्टिकवर बंदी, कापडी व पुनर्वापरयोग्य पिशव्यांचा वापर, घराघरात कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग व रिसायकलिंग, स्वच्छता मोहीम, श्रमदान आणि शाळा व ग््राामसभांमधून जनजागृती यावर भर दिला पाहिजे, असेही ढोरे यांनी सुचवले. तसेच, माझा कचरा, माझी जबाबदारी ही संकल्पना प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक असून, प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. त्यानुसार, या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता देत तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून प्लास्टिक व कचरामुक्त मावळ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्लास्टिक व कचरा ही समस्या आता गंभीर बनली आहे. आज आपण घेतलेले निर्णय उद्याच्या पिढीचे भविष्य ठरवतील. प्लास्टिक व कचरामुक्त मावळ हा केवळ नारा नसून, तो आपला सामूहिक संकल्प असला पाहिजे.
दिलीप ढोरे, गटनेते, पंचायत समिती मावळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT