वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पाच गट व दहा गणांमध्ये शनिवार (दि. 7) उत्साहात मतदान झाले. एकूण 2 लाख 316 मतदारांपैकी सुमारे 77 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक अधिकारी विक्रम देशमुख यांनी सांगितले. दरम्यान सोमवार (दि. 9) सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
मावळ तालुक्यात शनिवारी सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारपर्यंत चांगलाच वेग धरला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात मतदानाची टक्केवारी अवघी 8.63 टक्के झाली होती. त्यानंतरच्या दोन तासांत सकाळी 11.30 वाजेपर्यंत ही टक्केवारी 24.45 इतकी झाली, त्यामुळे सकाळी 10 नंतर मतदानाचा वेग वाढल्याचे दिसते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी 42.11 टक्के मतदानाची नोंद झाली, म्हणजे 84 हजार 353 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी 3.30 वाजेपर्यंत तब्बल 1 लाख 16 हजार 631 मतदारांनी मतदान केले, म्हणजे मतदानाची टक्केवारी ही 58.22 टक्के इतकी झाली होती.
शेवटच्या दोन तासांत म्हणजे सायंकाळी 4 नंतर बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती त्यामुळे या शेवटच्या दोन तासांत मतदानाचा टक्का चांगलाच वाढला असून एकूण टक्केवारी सुमारे 77 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्रावरून आलेल्या मतपेट्या जमा करण्याचे काम सुरू होते.
सोमवार(दि. 9) सकाळी 10 वाजता वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयातील नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. मतमोजणी साठी 20 टेबल व टपाली मतदानासाठी
5 टेबल लावण्यात येणार आहे. प्रत्येकी चार टेबलवर एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण अशी मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व गट आणि गणांचा संपूर्ण निकाल दोन तासांत पूर्ण होईल, असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक अधिकारी विक्रम देशमुख यांनी व्यक्त केला.