Rose Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Rose Export: व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मावळच्या गुलाबांची जागतिक झेप; 70 लाख फुलांची निर्यात

300 हेक्टरवर गुलाब शेती; 50-60 कोटींचे परकीय चलन अपेक्षित, 5 हजारांना रोजगार

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: राज्यभरात भात पिकासाठी ओळख असलेल्या मावळ तालुक्याने गेल्या काही वर्षांत जागतिक गुलाब शेतीचे केंद्र म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे. यंदा व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मावळच्या गुलाबांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी झेप घेतली आहे. तालुक्यातून तब्बल 60 ते 70 लाख गुलाबांची निर्यात देश-विदेशात होणार आहे. या विक्रमी निर्यातीमुळे 50 ते 60 कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळणार असल्याचा अंदाज आहे.

300 हेक्टरवर विस्तारलेली शेती

मावळचे हवामान गुलाब शेतीसाठी अत्यंत पोषक ठरले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत तालुक्यात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रावर गुलाब शेती विस्तारली आहे. पवना संस्कृती फार्म प्रोड्युसर अंतर्गत होणाऱ्या उत्पादनातही यंदा दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 7 लाख फुलांची निर्यात झाली होती.

दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा

यंदा गुलाबाच्या दरांमध्येही सकारात्मक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी स्थानिक बाजारपेठेत 18 ते 20 रुपये दर मिळत होता, तो यंदा 25 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, परदेशी बाजारपेठेत 20 रुपये दर मिळत असताना स्थानिक बाजारपेठेत उत्पादकांना 5 रुपये अधिक दर मिळत आहे. निर्यात दरही गेल्या वर्षीच्या 16 ते 18 रुपयांवरून यंदा 20 रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे शेतकरी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही बाजारपेठांमधून समाधानकारक नफा कमवत आहेत.

शास्त्रीय पद्धतीने उत्पादन व प्रक्रिया

परदेशात निर्यात करण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच झाडांची छाटणी (कट बेडिंग) आणि सेंद्रिय खतांचे नियोजन केले जाते. यंदा तापमानात 7 ते 8 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे फुले 45 ते 50 दिवसांत तयार झाली आहेत. निर्यातीपूर्वी फुलांची शास्त्रीय पद्धतीने प्रतवारी करून प्री-कुलिंग प्रक्रिया केली जाते, जेणेकरून विमान प्रवासात फुलांचा ताजेपणा टिकून राहतो.

5 हजार जणांना रोजगार

गुलाब शेतीमुळे मावळात सुमारे 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. यात 65 ते 70 टक्के महिलांचा सहभाग असल्याने ग््राामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळाली आहे. भातशेतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्याने आता गुलाब शेतीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ठसा उमटवला असून, मावळचा गुलाब ही ओळख आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक दृढ होत आहे.

टॉप सिक्रेट फुलाला मागणी

जपान, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फान्स, दुबई, फिलिपिन्स तसेच इतर आखाती देशांमध्ये मावळच्या गुलाबांना मोठी मागणी आहे. विशेषतः टॉप सिक्रेट या जातीच्या गडद लाल रंगाच्या आणि अधिक काळ ताजेपणा टिकवणाऱ्या गुलाबाला परदेशी ग््रााहकांकडून विशेष पसंती मिळत आहे.

फुलांची गुणवत्ता तपासूनच पॅकिंग केले जाते. मात्र, विमान भाडे वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शासनाने यासाठी विशेष सवलती द्याव्यात.
तानाजी शेंडगे, शेतकरी
यंदा हवामानामुळे काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या. तरीही उत्पादन चांगले झाले आहे. व्हॅलेंटाईन हंगाम समाधानकारक आहे.
मुकुंद ठाकर, अध्यक्ष, पवना फूल उत्पादक संघ
फुलांचे उत्पादन जितके महत्त्वाचे आहे, तितकीच त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. पॉलिहाऊसमधून उत्पादन घेणाऱ्या आणि निर्यात करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शीतगृह असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन छोटी शीतगृहे उभारली पाहिजेत.
ज्ञानेश्वर ठाकर, सचिव, पवना फूल उत्पादक संघ
गेल्या वर्षीपेक्षा यंदा फुलांना चांगली किंमत मिळत आहे. विशेषतः स्थानिक बाजारपेठेत परदेशापेक्षा अधिक दर मिळत असल्याने आम्ही समाधानी आहोत.
देविदास आडकर, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT