Maval Panchayat Samiti BDO Protest Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Panchayat Samiti BDO Protest: मावळ पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांविरोधात संताप; पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला ठोकले टाळे

अडीच महिन्यांच्या गैरहजेरीनंतर रुजू होण्यापूर्वीच विरोध; ‘आम्हाला हे बीडीओ नको’ म्हणत नवीन अधिकाऱ्याची मागणी, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचे स्टिंग

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: तब्बल अडीच महिन्यांनी हजेरी लावणाऱ्या मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू न देण्यासाठी सकाळपासूनच ठाण मांडून बसलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी अखेर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे लावले. आम्हाला हे बीडीओ नकोच, अशी भूमिका घेत नवीन अधिकारी द्यावा, अशी मागणी केली.

याप्रसंगी, सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, गटनेते दिलीप ढोरे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलक, योगेश लोहोर, रेश्मा देवकर, शैला कालेकर, प्राची गायकवाड, आशा मोरमारे, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, अनंता पावशे, पल्लवी दाभाडे, मनीषा मुऱ्हे उपस्थित होते.

मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान हे सुमारे अडीच महिन्यांपासून रजेवर असून, त्यांच्या जागी सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात हे प्रभारी म्हणून कारभार पाहत आहेत. दरम्यान, नवीन पदाधिकारी आल्यावर अवघ्या दोन महिन्यांतच गटविकास अधिकारी प्रधान हे रजेवर गेले होते. आज अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर गटविकास अधिकारी पंचायत समितीमध्ये पूर्ववत रुजू होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार, त्यांना खुर्चीवर बसू द्यायचे नाही, या उद्देशाने आज सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी पंचायत समितीमध्ये दाखल झाले.

आठवड्याची रजा; अडीच महिने गायब

सकाळी १०.३० वाजेपर्यंत गटविकास अधिकारी प्रधान यांची वाटही पहिली आणि त्यानंतर त्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. केवळ ८ दिवसांच्या रजेवर जातो म्हणून गेलेले गटविकास अधिकारी प्रधान हे तब्बल अडीच महिने रजेवर असून, प्रशासकीय कालावधीत नियमित हजर राहणारे, पदाधिकारी कारभार सुरू झाल्यावर मात्र टाळाटाळ करतात. त्यामुळे हे गटविकास अधिकारी नकोच, अशी भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.

पदाधिकाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन; अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास गटविकास अधिकारी कार्यालयात येऊन बसले होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांची कामाची वेळ सकाळी ९.४५ ही असताना सकाळी १०.३० वाजेपर्यंत बहुतांश अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये बरेच अधिकारी, कर्मचारी वेळेवर आले नसल्याचे निदर्शनास आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT