

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी ते निगडी मार्गावरील ग्रेडसेपरेटरमध्ये पिंपरी व मोरवाडी येथे सतत पाणी गळती होत असल्याने रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. दुरूस्ती काम करूनही त्याचा फायदा होत नसल्याने महापालिका प्रशासनासह स्थापत्य विभागाचे अधिकारी वैतागले होते.
अखेर, एमआयडीसीची जलवाहिनी फुटून दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याने ग्रेडसेपरेटरमधील रस्ते खराब होत असल्याचे उघडकीस आले आहे. रस्ते खराब होण्याचे खरे कारण पुढे आल्याने महापालिका प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने दापोडी ते निगडी हा ग्रेडसेपरेटर हा प्रशस्त मार्ग तयार केला आहे. त्या रस्त्याचे देशभरात कौतुक झाले आहे. मात्र, ग्रेडसेपरेटरमध्ये पिंपरी, मोरवाडी, चिंचवड स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने वारंवार रस्त्यांवर खड्डे पडत होते. दुरुस्ती काम केल्यानंतरही पुन्हा खड्डे पडत होते. दुरूस्ती काम टिकून राहत नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनावर सातत्याने टीका होत होती.
मोरवाडी व पिंपरी चौक येथील ग्रेडसेपरेटरमध्ये एमआयडीसीची भूमिगत जलवाहिनी फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात होते. त्यामुळे डांबरी रस्ता पुन्हा पुन्हा उखडत होता. अवजड वाहनांच्या वाहतुकीमळे रस्त्यांवर असंख्य खड्डे पडत होते. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. एमआयडीसीच्या वाहिनीमुळे होणार्या पाणी गळतीमुळे हा प्रकार उघड असल्याचे महापालिका प्रशासनाच्या नुकतेच निर्देशनास आले.
त्यानंतर महापालिकेने रोष व्यक्त केल्यानंतर एमआयडीसी विभागाने तातडीने फुटलेली भूमिगत जलवाहिनी शनिवारी (दि.27) दुरूस्त करून घेतली. त्यामुळे ग्रेडसेपरेटरमधील पाणी गळती थांबली आहे. आता ग्रेडसेपरेटर मार्गावर पाणी गळती होणार नाही. तसेच, रस्त्यावर खड्डे पडणार नाही, असा दावा महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून करण्यात आला आहे.