

पिंपरी: मुळशी तालुक्यातील माण येथे जमिनीच्या वादातून चार जणांच्या टोळक्याने शाळेत घुसून वर्गखोल्यांची तोडफोड करत कार्यालयातील साहित्याला आग लावली. ही घटना सोमवारी (दि. १३) रात्री घडली.
या प्रकरणी शाळेचे लिपिक बाळासाहेब लक्ष्मण माने (५८, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश ज्ञानोबा पारखी (रा. माण, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली असून, अन्य तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
कोथरूड येथील जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने माण येथे न्यू इंग्लिश स्कूल चालविण्यात येते. या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेच्या जागेवरून प्रतिष्ठान आणि आरोपी पारखी यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी शाळा बंद करताना शिपायाने कार्यालयासह सर्व वर्गखोल्यांना कुलूप लावले होते.
रविवारी सुटीनंतर सोमवारी सकाळी शाळेला आग लागल्याची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कार्यालय आणि वर्गखोल्यांची तोडफोड झाल्याचे तसेच अनेक साहित्य जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, आरोपींनी शाळेच्या कार्यालयाचे पत्रे फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर महत्त्वाच्या साहित्यास आग लावल्याचे समोर आले. घटनेत पाच लाख ७५ हजारांचे नुकसान झाले आहे. मुख्य आरोपी गणेश पारखी याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.