पिंपरी: मावळ तालुक्यातील आंबळे येथील जमिनीत बेकायदा स्फोटके लावून मोठ्या प्रमाणात दगड-मुरूमाचे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्याने केला आहे. जमिनीत तब्बल २५० ते ३०० फूट खोल उत्खनन करून जमीन उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा करीत शेतकऱ्याने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात धाव घेतली आहे. पोलिस आणि महसूल प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.
स्थानिक शेतकरी विष्णू बाजीराव अंभोरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार अर्ज दिला आहे. रामदास काकडे, रणजित काकडे, किरण काकडे आणि युवराज काकडे यांच्याविरोधात हा अर्ज करण्यात आला आहे.
अंभोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संबंधितांनी त्यांच्या जमिनीत बेकायदा स्फोटके लावून उत्खनन केले. दगड फोडण्यासाठी परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून स्फोटकांचा वापर करण्यात आला. उत्खनन झालेले काही क्षेत्र वनविभागाच्या कक्षेत येत असून, भूजल पातळीपेक्षाही खोलवर खोदकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी हे उत्खनन २५० ते ३०० फुटांपर्यंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणात महसूल अथवा पोलिस प्रशासनाने स्वतःहून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे अंभोरे यांचे म्हणणे आहे. आपल्या मालकीच्या जागेत स्फोटके लावून उत्खनन करू नये, यासाठी महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज देऊन पंचनामा करण्याची मागणी केली. मात्र, महसूल अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
माझ्याकडे उत्खननाचे सर्व परवाने आहेत. मात्र, अलीकडे राजकीय हेतूने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. यापूर्वी संबंधित विभागाकडून चौकशी पूर्ण झाली असून मी दंडही भरला आहे. मी कोणताही गैरव्यवहार केला नाही.रामदास काकडे, उद्योजक, मावळ
बेकायदा खाणकामाचा विषय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे संबंधित विभागाकडे तक्रार करण्यासंदर्भात तक्रारदाराला अवगत करण्यात आले असून, तसे लेखी स्वरूपातही कळविले आहे.विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ
गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनीचे उत्खनन केले जात आहे. मात्र, हा विषय महसूल विभागाच्या अखत्यारीत आहे. प्रथमदर्शनी यात फौजदारी कृत्य दिसून येत नाही. मागील महिन्यात पोलिसांकडे तक्रार अर्ज आला असून त्याबाबत चौकशी सुरू आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.संतोष पाटील, तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी
या प्रकरणाची तक्रार विभागाकडे प्राप्त झाली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. त्यानुसार, मावळ तहसीलदारांना चौकशी करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.आनंद पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे