SIM Swap Cyber Fraud: ‘नेटवर्क गेले’ म्हणून दुर्लक्ष करू नका; सिम स्वॅपने सायबर चोरट्यांचा लाखोंचा डल्ला!

पिंपरीत ८२ वर्षीय महिलेच्या खात्यातून ८.५४ लाख लंपास; सिम अचानक बंद पडल्यास तातडीने सावध होण्याचे आवाहन
SIM Swap Cyber Fraud
SIM Swap Cyber FraudPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: मोबाईलचे सिम अचानक बंद पडले, नेटवर्क गायब झाले किंवा कॉल-एसएमएस येणे थांबले तर बहुतांश नागरिक त्याकडे 'नेटवर्क प्रॉब्लेम' म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, हाच निष्काळजीपणा सायबर चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे. संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचे दुसरे सिम सक्रिय करून आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्याच्या 'सिम स्वॅप' फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. विशेषतः मोबाईल आणि ऑनलाइन बँकिंग व्यवहार नियमितपणे न तपासणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

SIM Swap Cyber Fraud
Pimpri Chinchwad Housing Societies: खासगी सोसायट्यांवर एसटीपी-कंपोस्टची सक्ती; महापालिका गृहप्रकल्पांना मात्र नियमांचा अपवाद?

..अशी आहे सिम स्वॅपची मोडस

'सिम स्वॅप'मध्ये सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या सिमकार्डवर सक्रिय करण्याचा प्रयत्न करतात. हे सिम कार्यान्वित होताच मूळ सिमची सेवा खंडित होते. त्यानंतर त्या क्रमांकावर येणारे एसएमएस आणि बँकिंगशी संबंधित माहिती दुसऱ्या सिमवर पोहोचण्याचा धोका निर्माण होतो. या वेळी खातेदाराचे दुर्लक्ष सायबर चोरट्यांसाठी फायद्याचे ठरत आहे. मोबाईलमध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल किंवा काही वेळाने नेटवर्क पूर्ववत होईल, असे समजून नागरिक प्रतीक्षा करतात. या कालावधीत आरोपी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे नेहमी व्यवस्थित सुरू असलेले सिम कोणतेही स्पष्ट कारण नसताना निष्क्रिय झाल्यास त्यामागील कारण तातडीने तपासणे महत्त्वाचे ठरत आहे.

SIM Swap Cyber Fraud
Dapodi Traffic Jam: दापोडी-फुगेवाडीत वाहतूक कोंडीचा विळखा; खड्डे, अतिक्रमण अन् रखडलेल्या कामांनी वाहनचालक हैराण

खात्यातून साडेआठ लाख लंपास

हिंजवडी परिसरातील ८२ वर्षीय गृहिणीला सिम स्वॅपच्या माध्यमातून तब्बल ८ लाख ५४ हजार ६२५ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने महिलेच्या संमतीशिवाय तिचा एअरटेल कंपनीचा मोबाईल क्रमांक ११ ऑगस्ट रोजी बंद केला. त्यानंतर त्याच मोबाईल क्रमांकाचे जिओ कंपनीचे सिमकार्ड सक्रिय करण्यात आले. या सिमचा वापर करून १२ ते १५ ऑगस्टदरम्यान महिलेच्या एचडीएफसी बँक खात्यातील एकूण ८ लाख ५४ हजार ६२५ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आले. प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी १९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SIM Swap Cyber Fraud
Dehu Road Highway Encroachment: देहूरोडमध्ये महामार्गाला अतिक्रमणांचा विळखा; वाहतूक कोंडीसोबत अपघातांचा धोका वाढला

ज्येष्ठ नागरिक 'टार्गेट'

ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सायबर चोरट्यांना अधिक वेळ मिळण्याची शक्यता असते. अनेक ज्येष्ठ नागरिक मोबाईलवरील प्रत्येक एसएमएस, बँकेचे अलर्ट किंवा ऑनलाइन व्यवहार सातत्याने तपासत नाहीत. काहींचा इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआयचा वापरही मर्यादित असतो. त्यामुळे खात्यातून ऑनलाइन व्यवहार सुरू असले तरी त्याची माहिती उशिराने मिळण्याची शक्यता असते. याशिवाय, मोबाईलची सेवा खंडित झाल्यास अनेक ज्येष्ठ नागरिक आधी फोनमध्ये बिघाड असल्याचे गृहीत धरतात. त्यामुळे त्यांच्या नावावर असलेल्या मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याबाबत कुटुंबीयांनीही जागरूक राहणे आवश्यक आहे. विशेषतः अचानक सेवा खंडित झाल्यास दूरसंचार कंपनीकडून पडताळणी करणे गरजेचे आहे.

'नेटवर्क'ची वाट पाहत बसू नका

सिमची सेवा अचानक बंद झाल्यास केवळ मोबाईल बंद-चालू करून किंवा नेटवर्क पूर्ववत होण्याची वाट पाहून वेळ घालवू नये. दुसऱ्या मोबाईलवरून संबंधित दूरसंचार कंपनीच्या अधिकृत ग्राहक सेवेशी संपर्क साधून आपल्या क्रमांकावर नवीन सिम जारी किंवा सक्रिय करण्यात आले आहे का, याची खात्री करावी. यासोबतच बँक खात्यातील अलीकडील व्यवहार तपासावेत. संशयास्पद व्यवहार आढळल्यास इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि कार्ड व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बँकेशी तातडीने संपर्क साधावा. ओटीपी, पिन, सीव्हीव्ही, पासवर्ड तसेच इतर गोपनीय बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये. सायबर फसवणुकीचा संशय आल्यास विलंब न करता पोलिसांकडे तक्रार करणे महत्त्वाचे आहे.

SIM Swap Cyber Fraud
Lonavala Ganeshotsav DJ Ban: लोणावळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेला ‘नो एंट्री’; लेझर लाईट वापरल्यास गुन्हा दाखल

मोबाईलमुळे फसवणुकीच्या घटनेत वाढ

मोबाईल क्रमांक आता केवळ संपर्कापुरता मर्यादित राहिलेला नाही. बँक खाते, यूपीआय, इंटरनेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्डसह विविध आर्थिक सेवांशी तो जोडलेला आहे. व्यवहारांचे ओटीपी, बँकेचे अलर्ट आणि खात्याशी संबंधित महत्त्वाचे संदेशही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येतात. त्यामुळे या क्रमांकाचे नियंत्रण सायबर चोरट्यांकडे गेल्यास आर्थिक व्यवहारांनाही धोका निर्माण होतो.

मोबाईलचे नेटवर्क अचानक बंद झाल्यास किंवा कोणतेही कारण नसताना सिम निष्क्रिय झाल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने संबंधित मोबाईल कंपनीशी संपर्क साधून सिममध्ये कोणताही अनधिकृत बदल झाला आहे का, याची खात्री करावी. संशयास्पद प्रकार आढळल्यास बँक आणि सायबर पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा.

रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news