Drug Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Drug Racket: मावळात अमली पदार्थांचे खुलेआम रॅकेट; तुकाराम मुंढे यांच्या भेटीची सोशल मीडियावर मागणी

एमडी ड्रग्स, गुटखा आणि अवैध व्यवसायांमुळे तरुणाई व्यसनाधीन; कारवाईची तीव्र मागणी

पुढारी वृत्तसेवा

गणेश विनोदे

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीसंदर्भात अनेकदा मोर्चे, आंदोलने करून किंवा पोलिस प्रशासनाकडून कारवाई होऊनसुद्धा फरक पडत नसल्याने राज्यभर चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनीच एकदा मावळात व्हिजीट द्यावी, अशी मागणी सोशल मीडियाद्वारे होत आहे.

मावळ तालुक्यात एकीकडे औद्योगिक, शैक्षणिक, पर्यटन विकास होत असताना दुसरीकडे मात्र शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडेच खुलेआम दारूविक्री सुरू आहे. टपऱ्यांवर सर्रासपणे एमडी, मावा, गुटख्याची विक्री होत आहे. त्यामुळे अमलीपदार्थ सहजपणे उपलब्ध होत असल्याने याचा परिणाम थेट तरुण पिढीवर होऊ लागला आहे.

तालुक्यात सुरू असलेले एमडीचे रॅकेट, खुलेआम दारूविक्री, भररस्त्यावर वेश्याव्यवसाय, पान टपाऱ्यांवर मावा, गुटख्याची विक्री यामुळे तालुक्यातील तरुणवर्ग व्यसनाधीन होत चालला असून, अलीकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारीला व गुन्ह्यांमध्ये असलेल्या अल्पवयीन मुलांच्या सहभागाला या गोष्टीच कारणीभूत असल्याचे दिसते. दरम्यान, पोलिस प्रशासन अन् उत्पादन शुल्क विभाग करतोय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्व सुरू असूनही हाताची घडी तोंडावर बोट

हे सर्व खुलेआम सुरू असले तरी याकडे पोलिस, उत्पादन शुल्क विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असून राजकीय पुढारीही याबाबत बोलताना दिसत नाही. व्यसने करण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी छोटे मोठे गुन्हे करायचे, नशा केल्यावर पुन्हा रात्री-अपरात्री चोऱ्या, लुटमार असे गुन्हे करायचे, यातूनच पुढे खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्याकडे तरुणवर्ग ओढला जात आहे. एकंदर व्यसनाधीन होत चाललेला मावळातील तरुणवर्ग गुन्हेगारीकडे ओढला जात असल्याचे दिसते. एकंदर, मावळात सुरू असलेली अमली पदार्थांची विक्री रोखायची असेल तर आता तुकाराम मुंढे यांच्याशिवाय पर्याय नाही, अशा भावना सोशल मीडियावर काही जाणकार व्यक्तींकडून व्यक्त होत असून तुकाराम मुंढे साहेब एकदा मावळात व्हिजीट द्या, अशी मागणी होत आहे.

कारवाईमुळे मावळातील एमडी रॅकेट उघड!

अमली पदार्थांमध्ये नव्याने आलेल्या एम.डी.ची केवळ तरुणांमध्येच नाही, तर अल्पवयीन मुलांमध्ये मोठी क्रेझ आहे. जवळपास तीन ते पाच हजार रुपये ग्रॅम दराने मिळणारा एम.डी. तालुक्यात सहज विकला जात आहे. पानमसाला किंवा गुटखा सुपारीमध्ये मिसळून एमडीचे सेवन केले जाते, वास न येता नशा देणारा हा अमली पदार्थ आहे. वेळप्रसंगी तो उपलब्ध झाला नाही किंवा खर्चिक असल्याने मुले दारूच्या व्यसनाकडे वळत आहेत. एम.डी. खोपोली, खंडाळा येथून मावळात येत असून लोणावळा, कामशेत, वडगाव या शहरांमध्ये त्याचे मोठे रॅकेट असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. गेल्या तीन चार महिन्यांत प्रामुख्याने तळेगाव दाभाडे, लोणावळा पोलिसांकडून एमडी तस्करी करणाऱ्यावर कारवाई झाल्याने व साठा सापडल्याने मावळात एमडीचे रॅकेट खरोखर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तरुणाई व्यवसनांच्‍या आहारी

गुटखा, मावा खाणारी मुले आता एमडी या अमलीपदार्थाच्या आहारी गेली आहेत. दारू पिऊन नशा करण्याऐवजी एम.डी. खाऊन नशा करायची नवी पद्धत तरुणाईमध्ये निर्माण झाली आहे. याशिवाय कुठेही, कधीही दारू मिळत असल्याने ओल्या पार्ट्यांवरही तरुणाईचा कल वाढत आहे. इतकेच नाही, तर अनेक तरुण मसाजच्या नावाखाली पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या स्पा सेंटरपर्यंत पोचली आहेत.

अवैध व्यवसायाचे माहेर

याशिवाय, तालुक्यात भररस्त्यावर वेश्याव्यवसाय सुरू असल्याने पंचक्रोशीतील लॉजिंग व्यवसायही तेजीत आला आहे. प्रामुख्याने देहूरोड, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथील तळ्याचा परिसर, वडगाव - तळेगाव फाटा या ठिकाणी मुंबई-पुणे महामार्गावच खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू आहे. तळेगाव एमआयडीसी परिसरातही मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सुरू आहे. यामुळे तरुण पिढीमध्ये वेश्याव्यवसायाचे स्वरूप सहजरित्या बिंबवले जात असून तरुणवर्ग आपोआप याकडे ओढला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT