Resignation Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval APMC Resignations: मावळ बाजार समितीत मोठी उलथापालथ; 13 संचालकांचे राजीनामे

राष्ट्रवादीत फुटीचा परिणाम; संस्था बरखास्तीच्या उंबरठ्यावर

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या 13 पैकी 9 संचालकांनी आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानुसार सोमवारी राजीनामे दिले होते. आज उर्वरित चार जणांनी राजीनामे दिल्याने अखेर पक्षातील फुटीरांमुळे बाजार समितीचा बाजार उठल्याची चर्चा रंगली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 12, काँग्रेसचे 1 व भाजपाचे 5 असे संख्याबळ असताना नुकत्याच झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलावडे यांना 7 तर भाजपचे उमेदवार सुभाषराव जाधव यांना 11 मते मिळाली आणि ते विजयी झाले. यामध्ये राष्ट्रवादीचीच 6 मते फुटली आणि बाजार समिती भाजपच्या ताब्यात गेली आणि स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादीवर नामुष्कीची वेळ आली.

या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी बाजार समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची तातडीची बैठक घेतली व सोमवारी सर्वांनी राजीनामे द्यावेत अन्यथा हकालपट्टीची कारवाई करण्याचा इशारा आमदार शेळके यांनी दिला होता.

त्यानुसार, आज राष्ट्रवादी व काँग्रेसच्या एकूण 13 संचालकांपैकी दिलीप ढोरे, विक्रम कलावडे, भरत टकले, अमोल मोकाशी, मारुती वाळुंज, नथुराम वाघमारे, सुप्रिया मालपोटे, अंजली जांभुळकर व काँग्रेसचे विलास मालपोटे या 9 जणांनी सोमवारी सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांच्याकडे स्वतः जाऊन आपले राजीनामे सुपूर्द केले. त्यानंतर आज (मंगळवार) उर्वरित माजी सभापती संभाजी शिंदे, माजी उपसभापती नामदेव शेलार, उपसभापती विकास मानकर व संचालक शंकर वाजे यांनीही राजीनामे दिले.

संस्था बरखास्तीच्या मार्गावर; पण चित्र बदलूही शकते

बाजार समितीमधील एकूण 18 पैकी तब्बल 13 जणांनी राजीनामे दिल्याने बाजार समिती बरखास्त होण्याच्या मार्गावर असून, संबंधित प्राप्त झालेले राजीनामे जिल्हा निबंधकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांनी सांगितले. दरम्यान, राजीनाम्यांची मंजुरी व संघ बरखास्तीची प्रक्रियेसाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असून, या काळात आणखी काही घडामोडी घडल्या तर चित्र बदलूही शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT