वडगाव मावळ: मावळच्या आरोग्यसेवेत रुग्णवाहिकांचं मोठं रॅकेट असल्याची तक्रार पत्रकारांसह स्वतः आमदार सुनील शेळके यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात रुग्णवाहिकांच्या माध्यमातून सुरू असलेला गोरखधंदा चव्हाट्यावर आला आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी कान्हे फाटा येथील उपजिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी पत्रकारांनी रुग्णवाहिका सेवेबाबत तक्रार करून खासगी किंवा विविध संस्थांच्या नावाने सुरू असलेल्या रुग्णवाहिका कशा पद्धतीने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लूट करतात, याबाबत आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली.
खासगी रुग्णवाहिका तत्काळ दाखल
शासनाच्या 108 क्रमांकावर फोन लावल्यास तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होते, अशी व्यवस्था आहे. तरीही संबंधित क्रमांकावर फोन केल्यास कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. मात्र, खासगी किंवा एखाद्या संस्थेची रुग्णवाहिका तत्काळ रुग्णालयात किंवा अपघातस्थळी दाखल होते. रुग्णाचे नातेवाईक त्या परिस्थितीत कुठलाही विचार न करता त्या रुग्णवाहिकेचा लाभ घेतात आणि त्यांच्याकडून 8 ते 10 हजार रुपयांची मागणी होते, अशी तक्रार पत्रकारांनी या वेळी केली.
यावर बोलताना आमदार शेळके यांनीही पत्रकारांच्या तक्रारीला दुजोरा देत हे वास्तव असून, मावळात रुग्णवाहिकांचे मोठं रॅकेट असल्याचे सांगितले. माझ्या स्वतःच्या दोन रुग्णवाहिका महामार्गावर उभ्या असतात; परंतु या रॅकेटमुळे त्यांचा वापर होत नसल्याची खंतही आमदार शेळके यांनी या वेळी व्यक्त केली.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चौकशीचे आदेश
यासंदर्भात आरोग्यमंत्री यांनी मंजूर असलेल्या शासकीय रुग्णवाहिका सुस्थितीत आहेत का, आणि त्या वेळेवर का येत नाही. नागरिकांना 108 व 102 ची सुविधा मिळते का? मिळत नसेल तर का मिळत नाही? याची चौकशी करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, मावळ तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र सुस्थितीत सुरू आहेत का?, तिथे रुग्णांना सेवा मिळते का? याबाबत विचारले असता आरोग्यमंत्र्यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्या स्थितीबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले.
सरकारी डॉक्टरांचे खासगी डॉक्टरांशी लॉबिंग?
या वेळी पत्रकारांनी सरकारी डॉक्टरचे रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे उपचार किंवा तपासणी करण्यास जाण्यासाठी रेफर करतात किंवा उपचार सरकारी रुग्णालयात झाले तरी औषधे मात्र खासगी मेडिकलमधून घेण्यास सांगतात. यामागे संबंधित सरकारी डॉक्टरांना कमिशन मिळत असल्याने सरकारी व खासगी डॉक्टरांचे लॉबिंग सुरू असल्याचीही तक्रार पत्रकारांनी केली. या वेळी आरोग्यमंत्र्यांनी असे काही प्रकार सुरू असतील तर ते तत्काळ बंद करण्यात येतील, असे सांगितले.