Maval BJP vs NCP Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Market Committee Election: मावळ बाजार समितीत राष्ट्रवादीला धक्का; भाजपचा सभापती

पक्षातील फुटीमुळे सत्ता गमावली; आमदार शेळके यांचा राजीनाम्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सहा मते फुटली आणि राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असताना भाजपचे सुभाषराव जाधव हे सभापती झाले. यामुळे मावळात सगळीकडे बोलबाला असलेल्या राष्ट्रवादीवर नामुष्कीची वेळ आली असून हा पराभव गांभीर्याने घेत आमदार सुनील शेळके यांनी थेट पक्षाच्या संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश दिले असून राजीनामे न दिल्यास पक्षातून हकालपट्टी करणार असून पुन्हा या सर्वांसाठी माझे दरवाजे बंद असा सणसणीत इशारा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 व काँग्रेसचा (आय) 1 असे 13 चे स्पष्ट बहुमत असून भाजपचे अवघे 5 सदस्य आहेत. असे असताना नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाषराव जाधव यांना 11 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलावडे यांना 5 मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीची 6 मते फुटल्याने उघड झाले.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षातीलच फुटीरांमुळे पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादीवर नामुष्कीची वेळ आली असून या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी बाजार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व सदस्यांमी सोमवारी राजीनामे द्यावेत असा आदेश दिला व राजीनामे न दिल्यास हकालपट्टी करण्याचा इशाराही दिला आहे.

‌‘पुढारी‌’ च्या वृत्तानंतर राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर !

दरम्यान दैनिक पुढारीने भाजपचा डाव; राष्ट्रवादीला धोबीपछाड हे वृत्त प्रसिद्ध करून मावळ तालुक्यात सगळी सत्ता केंद्र ताब्यात घेणाऱ्या राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रातील पवना कृषक सहकारी संस्था खादी ग्रामोद्योग सहकारी संस्था खरेदी विक्री संघ व आता कृषी उत्पन्न बाजार समिती या सहकारी संस्थांमध्ये मात्र पक्षातीलच फुटीरांमुळे भाजप डाव टाकून राष्ट्रवादीला धोबीपछाड करत असल्याचे चित्र समोर आणले होते. रविवारी आमदार शेळके यांनी दिलेल्या या आदेशामुळे राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.

राजीनामे देण्यासाठी आजची मुदत ?

दरम्यान राजीनामे देण्याचे आदेश देताना आमदार शेळके यांनी सोमवार (दि. 6) सर्वांनी राजीनामे देण्याचा आदेश दिला असून सोमवार हीच अंतिम मुदत असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT