

पिंपळे गुरव: जुनी सांगवी येथील पवना नदी किनाऱ्यालगतचा सांगवी ते दापोडी मुख्य रस्ता बेवारस गंजलेल्या आणि धूळ खात पडलेल्या वाहनांच्या विळख्यात अडकला आहे. यामुळे रस्ता वाहतुकीस अरुंद होऊन वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला स्कूटर, मोटारसायकली चारचाकी वाहने तसेच ऑटो रिक्षा अनेक दिवसांपासून उभी असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जुनी सांगवी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, दिवसभर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रेलचेल असते. त्यातच परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या उद्यानामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही बेवारस वाहने पदपथ आणि रस्त्याची जागा अडवत असल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
या बेवारस वाहनांमुळे एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ही वाहने हटविल्यास रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल आणि परिसरातील स्वच्छताही राखणे सुलभ होईल. आता तरी प्रशासनाने जागे होऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर तात्काळ कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.
शहराच्या सौंदर्याला बाधा
या वाहनांमुळे केवळ वाहतुकीची समस्या निर्माण झालेली नसून, परिसरात अस्वच्छतेचे प्रमाणही वाढले आहे. सध्या अवकाळी पावसामुळे अनेक वाहनांमध्ये पाणी व कचरा साचत असून, डासांची पैदास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. तसेच या बेवारस वाहनांचा गैरवापर होऊन गुन्हेगारी कृत्ये किंवा अमली पदार्थांच्या हालचालींसाठी वापर होण्याची भीतीही स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
वाहतूक विभागाचा काणाडोळा
स्थानिक नागरिकांच्या मते ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. रस्ते मोकळे करणे हे पालिका व वाहतूक पोलिसांचे कर्तव्य असतानाही वर्षानुवर्षे उभी असलेली ही वाहने हटवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जुनी सांगवी परिसरातील बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच बेवारस वाहने आढळून आल्यास त्याबाबत महापालिकेला पत्राद्वारे कळविण्यात येईल.
सुदाम पाचोरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी
बेवारस वाहने हटविण्याचे काम वाहतूक विभागाच्या समन्वयाने करण्यात येणार आहे. वाहतूक विभागामार्फतच अशा वाहनांवर कारवाई करून ती हटविण्यात येतात. सांगवी हद्दीत बेवारस अवस्थेत उभी असलेली तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने काढून टाकण्यासाठी संबंधित वाहतूक विभागास आवश्यक ती कारवाई करण्याबाबत पत्र पाठविण्यात येईल.
राजू कांबळे, कार्यालयीन अधीक्षक, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, मनपा