

पिंपरी: गेल्या काही वर्षांत शहराचा वाढलेला विस्तार आणि लोकसंख्या; तसेच वाढलेली रुग्णसंख्येमुळे रक्ताची गरजही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत रक्तदाते मिळत नसल्याने रक्तपढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
रक्तदान करण्याचे आवाहन
शहरात सुमारे 8 ते 10 रक्तपेढ्या आहेत. यातून शहरातील विविध रुग्णालयांना मागणीनुसार रक्तपुरवठा करण्यात येतो. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे. कर्करोग, डेंगूच्या रुग्णांची वाढती संख्या आणि शस्त्रक्रियांसाठी रक्ताची मागणी वाढली आहे. रक्तपेढ्या आणि रुग्णालये रक्तदात्यांच्या शोधात आहेत. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांकडून केले जात आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
सध्या परीक्षांचा कालावधी आहे. त्यानंतर एप्रिलच्या अखेर आणि मे महिन्यात सुट्यांच्या कालावधीत रक्तदान शिबिरे कमी घेतली जातात. त्यामुळे शिबिराअभावी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस पुरेल इतकाच साठा रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असल्याने तुटवडा वाढण्याच्या भीतीने रुग्णालयांसह रक्तपेढ्यांनी दात्यांचा शोध सुरू केला आहे. शहरात प्रदूषण, त्यासोबत सध्या कर्करोग, डेंगूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. रुग्णालयांमधून रक्त आणि रक्ताच्या विविध घटकांची मागणी होऊ लागली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडू लागला आहे. रक्तातून काढलेले प्लेटलेट (आरडीपी) मिळत नाहीत. सिंगल डोनर प्लेटलेट मिळत नाही. केवळ प्लेटलेट काढले तरी रुग्णाची गरज भागते. शहरातील मोठ्या रुग्णालयांसह अन्य छोट्या-मोठ्या रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
रक्ताचा तुटवडा एप्रिल महिन्यापासूनच सुरू झाला आहे. चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. रक्तदान शिबिरे घेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. दररोज 50 पिशव्यांची गरज असते आणि 30 पिशव्या उपलब्ध असतात. त्यामुळे एखाद्याला शस्त्रक्रिया करायची असेल तर ती पुढे ढकलावी लागते.
दीपक पाटील, प्रशासकीय अधिकारी, पिंपरी सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर
आमच्याकडे सध्या 25 दिवसांचा रक्ताचा साठा आहे. फक्त मे महिन्यामध्ये आम्हाला रक्त पिशव्यांचा तुटवडा भासतो. सध्याला 60 ते 70 पिशव्यांची मागणी आहे.
डॉ. नीता घाटगे, रक्त संक्रमण अधिकारी, वायसीएम रक्त पेढी
आमच्याकडे पुरेसा साठा आहे; पण पुढील महिन्यात शाळा, कॉलेजला सुट्या असल्यामुळे तुटवडा जाणवू शकतो. गरज भासल्यास आम्ही रक्तदात्यांना बोलावतो. आमच्याकडे रक्तदात्यांची यादी असते. त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करून रक्ताची गरज भागविली जाते.
डॉ. मोहन कदम, जनसपंर्क अधिकारी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय