

पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कमधील महत्त्वाचा सार्वजनिक वाहतुकीचा दुवा ठरणारा ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग-3’ प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनालाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) प्राधान्य दिले आहे. या प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या जवळपास 1 हजार 305 झाडांच्या बदलत्यात 5 हजार 500 नव्याने झाडांचे रोपण केले आहे. या नव्याने लावलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाण 100 टक्के असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
मेट्रो मार्गावरील खांब (पियर्स), स्थानके आणि जिन्यांच्या उभारणीमध्ये मार्गावरील विविध ठिकाणांची झाडे बाधित झाली होती. पीएमआरडीएने पर्यावरणपूरक भूमिका घेत यापैकी केवळ 557 झाडे तोडली, तर उर्वरित 748 झाडांचे सुरक्षितरीत्या पुनर्रोपण केले. तसेच, पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी तब्बल 5,500 नवीन झाडे लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ही नवीन झाडे पशुसंवर्धन विभाग, ताथवडे येथील कास्टिंग यार्ड, बावधनचे एनडीए वनक्षेत्र, एनसीएल, पंचवटी, हिंजवडी फेज-3 मधील एमआयडीसी प्लॉट, राजभवन आणि कृषी महाविद्यालय यांसारख्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आली आहेत.
‘क्यूआर कोड’ माध्यमातून संवर्धन
वृक्षारोपण मोहिमेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला असून त्याचे ‘जिओटॅगिंग’ करण्यात आले आहे. प्रत्येक झाडावर एक ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला आहे. नागरिकांनी मोबाईलवरून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास, त्यांना संबंधित वृक्षाचे नाव, त्याची प्रजाती आणि त्याचे पर्यावरणातील महत्त्व (फायदे) याबाबतची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. या सर्व वृक्षांचा सविस्तर डेटाबेस तयार करण्यात आला आहे.
पुनर्रोपण झाडांचे प्रमाण 80 टक्के
नव्याने लागवड केलेल्या सर्व 5,500 वृक्षांनी मूळ धरले असून ते 100 टक्के जगले आहेत. पुनर्रोपण केलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाणही 80 टक्के इतके आहे. हिंजवडी फेज-2 मधील वनक्षेत्रात सर्वाधिक म्हणजे सुमारे 3,000 झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले होते. विशेष म्हणजे या झाडांना आता फुले आणि फळे येण्यास सुरुवात झाली असून, हे या पर्यावरण मोहिमेच्या यशाचे मोठे द्योतक मानले जात आहे.
मेट्रो प्रकल्पामुळे होणारा पायाभूत विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पुनर्रोपित झाडांना आलेली फळे-फुले हे या मोहिमेच्या यशाचे गमक आहे.
डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए