Pandharpur Wari Photography Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Wari Dindi: मावळातून २१ दिंड्यांचा पंढरीकडे प्रवास; आषाढी वारीसाठी हजारो वारकऱ्यांची जय्यत तयारी

टाळ-मृदंगाच्या गजरात २० ते २५ हजार वारकरी सहभागी होणार; संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी मावळात उत्साह

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: 'जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी' या न्यायाने श्रीक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीची आस लागलेल्या मावळ तालुक्यातील वारकऱ्यांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंढरीच्या वाटेकडे पाऊले टाकण्यासाठी सर्व वारकऱ्यांचे लक्ष लागले असून, विठुनामाच्या जयघोषात मावळ तालुका न्हाऊन निघाला आहे.

संत तुकाराम महाराज पालखीचे मंगळवारी प्रस्थान

श्रीक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान मंगळवारी (दि. ७), तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान बुधवारी (दि. जुलै) होत आहे. या पार्श्वभूमीवर मावळातील हजारो वारकरी तयारीला लागले आहेत. १८ ते १९ दिवसांच्या या पायी प्रवासासाठी वारकऱ्यांनी अंथरुण-पांघरुण, पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट, छत्री, बसायला कागद,

दररोजच्या जेवणासाठी ताट-वाटीचे साहित्य, वारकरी पोशाख आणि पायवाटेने अखंड नामचिंतन घडण्यासाठी भजनी मालिका अशी सर्व जय्यत तयारी पूर्ण केली आहे. ज्ञानोबा-तुकाराम यांच्या गजरात वारीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मावळातील अनेक प्रमुख कीर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी मृदंगमणी,गायनाचार्य, सर्व दिंडींचे अध्यक्ष, दिंडीचालक, पदाधिकारी, तुळशी वृंदावन घेणाऱ्या माता भगिनी आणि टाळकरी सोहळ्यात सहभागी होतात.

मावळातून २१ दिंड्या होणार सहभागी

मावळ तालुक्यातून यंदा तब्बल २१ मुख्य दिंड्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळा आणि गवरशेट वाणी पालखी सोहळा यांच्यासोबत पायी प्रवास करत पंढरीकडे निघणार आहेत. यामध्ये मावळ तालुका दिंडी समाज, पवन मावळ दिंडी समाज, घोरवडेश्वर दिंडी, कोंडेश्वर दिंडी आदिवासी, तळेगाव माळवाडी दिंडी,

संत सेना दिंडी १, संतसेना दिंडी २, संत नामदेव दिंडी, भामचंद्र दिंडी, पोटोबा महाराज दिंडी, संत तुकाराम प्रासादिक दिंडी १, संत तुकाराम प्रासादिक दिंडी २, संत जगनाडे पालखी सोहळा, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दिंडी, गवरशेठ वाणी दिंडी, चक्रेश्वर, संगमेश्वर दिंडी वारंगवाडी पंचक्रोशी, गोरोबाकाका दिंडी मावळ,भैरवनाथ दिंडी आढे, बोधले बुवा दिंडी आणि वैकुंठगमन दिंडी यांचा समावेश आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखी हरिनाम घेत मावळातील सुमारे २० ते २५ हजार वारकरी भाविक या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT