वर्षा कांबळे
पिंपरी: गेल्या आठ वर्षांपासून म्हस्केवस्ती रावेत येथे सहगामी फाउंडेशनतर्फे ‘मस्ती की पाठशाळा’ चालवली जाते. अगदी रस्त्यावर सुरू केलेल्या या पाठशाळेचा मुख्य उद्देश मुलांना जवळपासच्या सरकारी शाळेत दाखल करणे हाच होता. कोवळ्या वयात कुटुंबासाठी भंगार विक्री, भीक मागणारी ही मुले आता पाठशाळेत येऊन शिकत आहेत. यातील प्रत्येक मुलांमागे भूतकाळातील कटू अनुभव आहे. मात्र, शिक्षणामुळे आता जीवन बदलले आहे.
एक रुपयासाठी भंगार विकणारा पिंटू
रावेत येथे रस्त्याच्या कडेला पत्राशेडमध्ये राहणारा पिंटू आदिवासी वय फक्त सहा वर्षे, सुटीच्या दिवशी वडील तर सोडाच पण आईसुद्धा पूर्णवेळ दारूच्या नशेत असते. त्यामुळे या भावंडांवर घरात लक्ष देणारे कोणी नाही. अशातच पिंटू एका रुपयासाठी भंगार विक्री करू लागला. ही बाब सहगामी फाउंडेशनच्या लक्षात आल्यानंतर त्याचे रावेतच्या पालिका शाळेत नाव घातले. एक रुपयासाठी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या पिंटूला पुन्हा शिक्षणाचा हक्क मिळवून दिला आहे. एकीकडे घरची अशी परिस्थिती पण दुसरीकडे देवाने या मुलामध्ये खूप सारे चांगले गुण दिले आहेत. सुंदर हस्ताक्षर, अभ्यासात हुशार, इंग्रजी माध्यमाच्या मुलांनादेखील येणार नाही असे इंग्रजीदेखील छान लिहितो.
फुटबॉल खेळाडू शकुंतला
अकरा वर्षाची शकुंतला हीचे मोलमजुरी करणारे आई - वडील आणि ही घरात सर्वात मोठी मुलगी. अशा वेळेस दोन लहान भावंडांना घेऊन घर सांभाळायचे. घरचे सगळे काम हीच करते. भंगार विकल्याने दिवसाकाठी 200 ते 300 रुपये मिळतात म्हणून भंगार विक्रीचे काम सुरू केले. घरात खाणारी तोंडे जास्त व कमाई कमी असताना मुले अशा रीतीने का होईना पैसे आणतात म्हणून आई वडीलसुद्धा अशा मुलांकडे दुर्लक्ष करतात. काही महिन्यांपूर्वी शकुंतला तिच्या लहान भावंडांसोबत मस्ती की पाठशाळेमध्ये जाते. शिक्षण घेतानाच तिला खेळातही आवड निर्माण झाली. ती सध्या उत्तम फुटबॉल खेळते. शकुंतला सध्या इयत्ता सहावीमध्ये शिकते.
रावेत येथे सहगामी फाउंडेशनने परप्रांतीय, वीटभट्टी मजूर, ऊसतोड कामगार यांच्या मुलांसाठी ’मस्ती की पाठशाळा’ सुरू केली. पहिल्यांदा एका पत्राच्या घरात ही शाळा सुरू झाली. आजही दररोज दोन तास, याप्रमाणे ज्यांना जसा वेळ असेल तसे स्वयंसेवक स्व-खुशीने येतात आणि मुलांना शिकवतात. आज या शाळेत जवळपास 65 मुले शिकतात. प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, रोशनी राय, कुसूम मज्जगी, अनिता माळी या सर्व स्वयंसेविका ही मस्ती की पाठशाला चालवितात.
विविध प्रांतातून आलेले हे कामगार इथे कष्टाने पोट भरतात. पण एका ठिकाणी किती दिवस वास्तव्य आहे हे माहिती नसल्यामुळे यांच्या मुलांना कुठल्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. त्यांना शिक्षणाचे महत्त्व नसल्यामुळे ही मुले वस्तीमधे किंवा रस्त्यावर खेळताना आढळतात. आई-वडील कामावर गेल्यावर ही मुले बरेचदा एकटीच असतात व घर सांभाळण्यासाठी मुलांना शाळेत पाठवायची पालकांची इच्छा नसते. त्यामुळे त्यांच्याच वस्तीमधे जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिकवले जाते.
भीक मागायला लावणाऱ्यांपासून सुटका
ऐश्वर्या काळे या मुलींच्या नातेवाईकांनी सांभाळ करतो असे सांगून आईपासून नेल्यानंतर तिला भीक मागायला लावली. तिची आई तिला शोधत अनेक गावे फिरत होती, पण ही लोके सारखे गाव बदलून जात होते. त्यामुळे तिचा शोध लागत नव्हता. भीक मागून दररोज साधारण 200 ते 500 रुपये मिळत होते व तो पैसा ते नातेवाईक स्वतःकडे ठेवून घेत. भिक मागण्यासाठी या मुलीला अंघोळसुद्धा करू देत नसत. शिक्षणाची आवड असली तरी सोनिया या सगळ्यांपासून दूर राहिली होती. पैशाऐवजी ती पुस्तके मागायची. यावरून तिचा शोध घेण्यात आला. सध्या सोनिया ही सर्व केस समजून बालकल्याण समितीने सोनियाला आईच्या ताब्यात दिले. सोनिया आश्रमात राहून शिकून मोठी अधिकारी होणार आहे.
बांधकाम मजूर दिवसभर कामावर गेल्यावर त्यांची मुलं ही वस्तीमध्ये दिवसभर भटकत असतात. या मुलांना शिक्षणाचे तसेच पालकांची त्यांना शिकविण्याविषयी महत्त्व नसते. यामागे या लोकांच्या अनेक अडचणी असतात. त्या अडचणी समजून घेऊन मुलांना शिक्षणाची गोडी लावून शिक्षण प्रवाहात आणावे, या उद्देशाने या मस्ती की पाठशाळेचा जन्म झाला. हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण झाली व त्यांनी शिकण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना वयानुसार त्या त्या इयत्तेमध्ये दाखल करण्यात आले.प्राजक्ता रुद्रवार (संस्थापिका, मस्ती की पाठशाला)