Marriage Proposal Drama Youth Climbs Mobile Tower Pudhari
पिंपरी चिंचवड

Mamurdi Mobile Tower Incident: प्रेयसीच्या होकारासाठी मद्यधुंद तरुण चढला १०० फूट उंच मोबाईल टॉवरवर; पावणेचार तासांचे प्रेमनाट्य

मामुर्डीतील प्रकार; लग्नाला होकार मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या क्रेनने तरुणाला सुखरूप उतरवले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: प्रेयसीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला अन् मद्यधुंदावस्थेतील प्रेमवीर थेट शंभर फूट उंच मोबाईल टॉवरवर जाऊन बसला. खाली उतरण्यासाठी पोलिस, अग्निशामक दल आणि नातेवाइकांनी विनवण्या केल्या; मात्र पठ्ठ्या काही ऐकायला तयार नव्हता. अखेर प्रेयसीला हातात हार घेऊन लग्नासाठी होकार द्यायला लावण्यात आला.

त्यानंतरच प्रेमवीराने खाली उतरण्याची तयारी दर्शविली. हा प्रकार रविवारी (दि. १) मामुर्डी येथे घडला. या प्रेमनाट्यामुळे पोलिस आणि अग्निशामक दलाची तब्बल पावणेचार तास दमछाक झाली. उबेदुल्ला शेख (वय २२, मूळ रा. धुबरी, आसाम) असे या तरुणाचे नाव आहे. मामुर्डी येथील गोदरेज कंपनीच्या टाऊनशिपमधील व्होडाफोनच्या लोखंडी टॉवरवर तो दुपारी साडेतीनच्या सुमारास चढला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबेदुल्लाचे शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध आहे. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मद्यधुंदावस्थेत त्याने थेट मोबाईल टॉवर गाठला. सुमारे शंभर फूट उंचीवर जाऊन तो बसल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांचे डीबी पथक, ११२ क्रमांकाचे पथक आणि अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खबरदारी म्हणून रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली.

दरम्यान, उबेदुल्लाला खाली उतरविण्यासाठी पोलिसांनी त्याची प्रेयसी, गावाकडील नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची मदत घेतली. मोबाईलवरून त्याच्याशी सातत्याने संवाद साधत समजूत काढण्यात आली. मात्र, त्याला खाली उतरविण्यासाठी सर्वांचीच चांगलीच कसरत करावी लागली. अखेर प्रेयसीला हातात हार घेऊन लग्नास होकार द्यायला लावण्यात आला. त्यानंतर त्याचे मन वळले. अग्निशामक दलाच्या मोठ्या क्रेनच्या मदतीने सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्याला सुखरूप खाली उतरविण्यात आले.

लग्नाला होकार मिळावा म्हणून शेख नावाचा तरुण मोबाईल टॉवरवर १०० फूट वर चढला होता. प्रेयसीला हार घेऊन खाली उभे केल्यानंतर तो टाॅवरवरून उतरण्यास तयार झाला. त्याला नोटीस देऊन समज देण्यात आली आहे.
विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, देहूरोड पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT