App Pudhari
पिंपरी चिंचवड

Majha Varg Teachers App: शिक्षकांचा कागदोपत्री ताण होणार कमी; ‘माझा वर्ग’ ॲपमुळे निकाल, नोंदी अन् अहवाल काही मिनिटांत!

पिंपरी-चिंचवडच्या उपशिक्षकाची अभिनव निर्मिती; इंटरनेटशिवायही वापरता येणाऱ्या ॲपला १०० हून अधिक शिक्षकांचा प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: शिक्षकांना शैक्षणिक कामासोबतच विद्यार्थ्यांची माहिती, निकाल, नोंदी, विविध अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ द्यावा लागतो. प्रशासनाकडून वारंवार मागविण्यात येणारी माहिती तयार करताना खर्च होणारा वेळ आणि कागदोपत्री लिखापढीचा कामाचा ताण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जाधववाडी कन्या शाळेतील एका उपशिक्षकाने शिक्षकांसाठी 'माझा वर्ग' हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.

मोबाईलवर सहज वापरता येईल, अशा पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या ॲपमुळे संगणक, लॅपटॉप किंवा एक्सेल चा वापर करण्यास अडचण येणाऱ्या शिक्षकांनाही विद्यार्थ्यांची माहिती व शैक्षणिक नोंदी सहजपणे एका क्लिकवर तयार करता येतात. विशेष म्हणजे ॲपच्या वापरासाठी इंटरनेटची आवश्यकता नसल्याने दुर्गम भागातील शिक्षकांनादेखील ऑफलाइन पद्धतीनेही विविध कामे करता येतात.

'माझा वर्ग' ॲपमध्ये विद्यार्थ्यांची माहिती एकदा भरल्यानंतर त्याच माहितीचा उपयोग विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामांसाठी करता येतो. निकाल तयार करणे, विविध नोंदी करणे, विद्यार्थ्यांच्या माहितीच्या याद्या तयार करणे, आवश्यक कागदपत्रे तयार करणे आदी कामे मोबाईलवरूनच करता येतात.

शिक्षकांचा डिजिटल सहायक

शिक्षकांना ॲप वापरण्यास सोपे जावे, म्हणून अ‍ॅपमध्ये व्हिडिओसुध्दा उपलब्ध करून दिले आहेत. 'माझा वर्ग' ॲप गुगल प्लेस्टोअर वर माझा वर्ग : टिचर्स स्मार्ट ॲप या नावाने उपलब्ध असून, शुक्रवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी लॉन्च होऊन १०० हून अधिक शिक्षकांनी ते इन्स्टॉल केले आहे व या अ‍ॅपला ५ स्टार रेटिंग मिळाली आहे. शिक्षकांचा वेळ वाचला, तर तोच वेळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी वापरता येईल, या विचारातून विकसित करण्यात आलेले 'माझा वर्ग' ॲप शिक्षकांसाठी डिजिटल सहाय्यक म्हणून उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

प्रत्येक विषयासाठी ५० हून अधिक नोंदी उपलब्ध

ॲपमध्ये प्रत्येक विषयासाठी ५० पेक्षा अधिक नमुना नोंदी उपलब्ध असून, शिक्षकांना ड्रॉपडाऊनमधून आवश्यक नोंद निवडता येते. तसेच स्वतःच्या नोंदी तयार करून त्या समाविष्ट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नोंदी नव्याने टाइप करण्याची गरज राहत नाही. या वैशिष्ट्यामुळे शिक्षकांच्या वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनास अधिक वेळ देता येऊ शकेल.

निकाल काही मिनिटांत उपलब्ध

निकालाच्या कामासाठीही ॲपमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. सत्र १ व सत्र २ चा संपूर्ण निकाल, श्रेणीनिहाय व संवर्गनिहाय निकाल तसेच अंतिम निकालपत्रक तयार करता येते. आवश्यकतेनुसार पीडीएफ स्वरूपात अहवाल तयार करून त्याचा वापर करता येतो. त्यामुळे पूर्वी शिक्षकांना निकाल तयार करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागायचा, मात्र आता या अॅपमुळे निकाल काही मिनिटांत उपलब्ध होऊ शकेल.

फलक लेखन, परिपाठ अन् सुविचारही

फलक लेखन व परिपाठासाठी ५०० पेक्षा अधिक मराठी व इंग्रजी सुविचार, महत्त्वाच्या कामांसाठी रिमांइडर तसेच वर्गशिक्षकांच्या नावासह विद्यार्थ्यांसाठी दैनिक घरचा अभ्यास, १७ प्रकारची गणितीय अमर्यादीत उदाहरणे आणि विषयनिहाय अभ्यासाच्या पीडीएफ तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

डेटा बॅकअप अन्रि स्टोरची सुविधा

ॲपमध्ये डेटा बॅकअप व रिस्टोरची सुविधाही देण्यात आली असून, विद्यार्थी माहिती एकदा भरल्यानंतर त्याचा पुढील शैक्षणिक वर्षांमध्येही उपयोग करता येतो. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक वर्षी अनेक माहिती पुन्हा नव्याने तयार करण्याचा त्रास कमी होऊ शकतो.

विविध कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात

याशिवाय बोनाफाईड प्रमाणपत्र, दाखला, प्रगती पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या विविध माहितीच्या याद्या पीडीएफ स्वरूपात तयार करण्याची सुविधा ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी संगणकावर अवलंबून राहण्याची गरज नाही. शिक्षकांच्या दैनंदिन कामासाठीही ॲपमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.

'माझा वर्ग' ॲपचा मुख्य उद्देश केवळ शिक्षकांचे काम सोपे करणे एवढाच नसून, लेखी व प्रशासकीय माहिती तयार करण्याच्या कामासाठी जाणारा वेळ वाचवून तो वेळ विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी उपलब्ध करून देणे, हा आहे. “शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अधिक वेळ द्यावा आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या माहिती संकलनाच्या कामाचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने हे ॲप विकसित केले आहे. संगणकाचा वापर करताना अडचण येणार्‍या शिक्षकांनाही मोबाईलवरून ही कामे सोप्या पद्धतीने करता यावीत, यासाठी ॲपचे डिझाइन सोपे ठेवले आहे,” या मुळे सर्व सर्व वयोगटातील शिक्षक याचा वापर सहज करतील.
संदीप वाघमोरे (उपशिक्षक, जाधववाडी कन्या शाळा, पिंपरी-चिंचवड महापालिका.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT