पिंपरी : भाजपच्या विजयाचा मेरू रोखण्यासाठी अजित पवारांना साद घालण्यासोबत आघाडीतील तसेच, इतर सर्व पक्षांची वज्रमूठ बांधून महाविकास आघाडी करण्यात येत आहे. त्यासाठी रणनीती ठरविण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत भाजपला महापालिकेची सत्ता पुन्हा काबीज करू द्यायची नाही, असा निर्धार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यादृष्टीने रणनीती आखण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आघाडीबाबत बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. ज्या पक्षाची ताकद अधिक आहे, त्यानुसार त्या पक्षाचे पॅनेल त्या प्रभागात असणार आहे. भाजपाला रोखण्यासाठी सहमतीने हा फॉर्मुला निश्चित करण्यात आला आहे. आघाडीची जुळणी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत महाविकास आघाडीचा बार उडण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपा व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडी असा तिरंगी सामना रंगणार आहे.
राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात युती झाली आहे. युती फुटल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे. दुसरीकडे, विरोधातील महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणाचे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे. सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी एकत्रित येण्यावर आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे.
या संदर्भात आतापर्यंत पाच ते सहा बैठका झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयात गुरुवारी (दि.18) आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस माजी आमदार चाबुकस्वार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे पृथ्वीराज साठे, बाबू नायर, मनोज कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महानवर रुपनर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले गैरहजर असल्याचे सांगण्यात आले.
आघाडीबाबत सर्वच पदाधिकारी पूर्वीपासूनच सकारात्मक आहे. सर्वच पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागवून मुलाखत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कोणत्या प्रभागात अधिक ताकद आहे. तेथील सक्षम उमेदवारांची यादी प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आली. कोणत्या पक्ष किती जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे, त्यावर साधकबाधक चर्चा झाली. ज्या प्रभागात ज्या पक्षाची ताकद आहे, तो प्रभाग त्या पक्षाला सोडण्यात येणार आहे. तसेच, प्रभागात एकाच पक्षाच्या चिन्हावर लढण्यास अधिक फायदा होईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे. तसे झाल्यास आघाडीकडून एका प्रभागातील सर्व उमेदवार हे एकाच चिन्हावर लढतील.
या फार्मुल्यास अंतिम रूप देण्यासाठी शुक्रवारी (दि.19) पुन्हा बैठक होणार आहे. त्यात आघाडीचे जागा वाटप पूर्ण करून ते मान्यतेसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठविले जाणार आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच आघाडीची घोषणा केली जाईल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आघाडी झाल्यास निवडणुकीत भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी असा तिरंगी सामना पाहावयास मिळणार आहे.
महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीबात चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून त्यासंदर्भात अद्याप कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. ते जो आदेश देतील त्यानुसार मनसे महापालिका निवडणुकीस सामोरे जाणार आहे, असे मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.
आघाडीतील सर्व पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आघाडीबाबत सकारात्मक आहेत. त्याबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. आघाडीचे चित्र अंतिम टप्प्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, मनसे तसेच, राष्ट्रीय समाज पक्ष आघाडीत असणार आहे. लवकरच याची घोषणा करण्यात येईल, असे शिवसेनेचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले.