Lonavala Nagar Parishad Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Majhi Vasundhara Award: ‘माझी वसुंधरा’ अभियानात लोणावळा नगर परिषदेचा राज्यात तृतीय क्रमांक; ३ कोटींचे पारितोषिक

घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची राज्यस्तरीय दखल; स्वच्छ व हरित लोणावळ्याकडे ठाम वाटचाल

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: ‌‘माझी वसुंधरा‌’ अभियानअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लोणावळा नगर परिषदेला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळाला असून, परिषदेला तब्बल 3 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्याने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

सदर कालावधीमध्ये लोणावळ्यात प्रशासकीय राजवट होती. प्रशासनाने या कालावधीत शहरात घनकचरा व्यवस्थापन, घरगुती कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिक बंदी जनजागृती, वृक्षारोपण, जलसंवर्धन, स्वच्छता मोहीम तसेच ऊर्जा बचत यांसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

या यशाबद्दल विद्यमान नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, मुख्याधिकारी अशोक साबळे, आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. विविध स्वयंसेवी संस्था (छॠज), महिला बचत गट (डकॠ), शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या सक्रिय सहभागामुळेच हा सन्मान शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेषतः घरगुती कचरा वर्गीकरणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शाळा- महाविद्यालयांतून राबविण्यात आलेले पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, स्वयंसेवी संस्थांची पर्यावरण मोहीम तसेच महिला बचत गटांचा स्वच्छता आणि प्लॅस्टिक कमी करण्यातील पुढाकार यामुळे लोणावळा शहराने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लोणावळा शहराला मिळालेला हा राज्यस्तरीय तृतीय क्रमांक संपूर्ण शहरवासीयांसाठी प्रेरणादायी असून, भविष्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि हरित लोणावळा घडविण्यासाठी प्रशासन व नागरिक यांचे सहकार्य पुढेही असेच कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT