Rain Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Monsoon Delay: लोणावळ्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम; उष्णतेने पर्यटक आणि शेतकरी दोघेही हैराण

भुशी धरण अजूनही कोरडेच; पावसाळी पर्यटन सुरू न झाल्याने व्यवसायांवर परिणाम, शेतकऱ्यांची चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पर्यटननगरी लोणावळा शहराला मान्सूनच्या प्रतीक्षेचे वेध लागले आहेत. मागील वर्षी मे महिन्यामध्ये मान्सूनला सुरुवात झाली होती व 17 जून रोजी लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेले भुशी धरण हे ओव्हर फ्लो झाले होते. साधारणपणे मागील तीन वर्षांचा अंदाज घेता 30 जूनपर्यंत भुशी धरण ओव्हर फ्लो होते व खऱ्या अर्थाने पावसाळी पर्यटनाच्या सीजनला सुरुवात होते. यावर्षी मात्र 7 जून ही तारीख आली तरी लोणावळा शहरामध्ये मान्सूनचे आगमन झालेले नाही.

गर्मीने नागरिक हैराण

अवकाळी पाऊसदेखील यावर्षी तुलनेने कमी प्रमाणात शहरामध्ये झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी उष्णतादेखील जास्त राहिल्यामुळे लोणावळा शहरातील नागरिक हे गर्मीने हैराण झाले आहेत. 26 मे रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल व आठवडाभरामध्ये तो महाराष्ट्रात सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, मान्सूनचे आगमन उशिराने होत असल्यामुळे अद्यापदेखील पर्यटननगरी लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला नाही.

पर्यटकांचा हिरमोड

वाढती उष्णता यामुळे नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा व मावळ तालुका ओळखला जातो. स्थानिक व्यावसायिकांनी मान्सूनच्या सीझनसाठी मोठी तयारी केली आहे. मात्र, अद्यापदेखील मान्सूनचे आगमन न झाल्यामुळे सर्वांच्याच लक्ष हे पावसाच्या आगमनाकडे लागले आहे. लोणावळा व खंडाळा परिसरामध्ये उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले असले तरी गर्मीने ते अक्षरशा हैराण झाले आहेत. गाडीमधून अथवा हॉटेल व बंगल्यांच्या एसी खोल्यांमधून पर्यटक बाहेर पडत नाहीत.

सकाळ व संध्याकाळ मात्र पर्यटनस्थळ व रस्त्यांवर मोठी गर्दी होत आहे. लोणावळा शहरातील भुशी धरण हे पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असते. सोबतच सहारा पुलासमोरील धबधबे, टायगर पॉईंटचा विहंगम परिसर, पवना धरण, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, कार्ला लेणी, आंदर मावळमधील हिरवागार निसर्ग व डोंगरदर्‍यांमधून वाहणारे धबधबे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकदेखील उत्सुक आहेत. मात्र मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे अद्याप घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झालेली नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

शेतकरी चिंतेत

केवळ पर्यटक व स्थानिक व्यवसाय करण्यास नव्हे तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील मान्सूनचे वेध लागले आहेत. मावळ तालुका हा ज्याप्रमाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तो भात शेतीचा तालुका म्हणूनदेखील ओळखला जातो. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यात भातशेती केली जाते व यासाठी पावसाचे नितांत गरज असते. धूळ वाफेचा अंदाज घेत शेतकरी भात रोपांची पेरणी करतात. ज्या भागांमध्ये पाण्याची सोय आहे, अशा ठिकाणी पाणी देत भात रोपे तयार करण्यात आली आहेत. काही ठिकाणी भात रोपांची पेरणी करण्यात आली असून, पावसाचे आगमन न झाल्यामुळे अद्यापही रोपे उगवलेली नाहीत. त्यामुळेदेखील शेतकरी चिंतातूर आहे. भात शेतीसाठी पावसाची आवश्यकता असल्यामुळे तसेच, रोपांची उगवण चांगल्या पद्धतीने होण्यासाठीदेखील पाऊस गरजेचा असल्यामुळे बळीराजाचेदेखील मान्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT