लोणावळा: पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला एमडी ड्रग्स व गांजाचा वापर सर्वांचीच चिंता वाढवणारा आहे. नशेच्या आहारी जाऊन तरुण पिढी ही नशेखोर होऊ लागली आहे. मागील महिन्यापासून आतापर्यंत ड्रग्सबाबतच्या तीन ते चार मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. ४ ऑक्टोबर रोजी लोणावळा शहरात बेकायदेशीरपणे मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्स या अमलीपदार्थाची विक्री व सेवन करण्यासाठी आलेल्या चार जणांच्या टोळीवर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ५ ग्रॅम एमडी अमलीपदार्थ आणि एक मारुती स्विफ्ट कार जप्त केली होती.
तसेच, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा हद्दीत अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कारवाई करत सुमारे ७४ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले होते. या प्रकरणी पनवेल येथील एका २८ वर्षीय तरुणाला रंगेहात पकडण्यात आले होते. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वलवण गावात २४.१९ ग्रॅम एमडी जप्त केले होते. या प्रकरणी मुंबईतील ३३ वर्षीय तरुणाला अटक केली हाेती. तसेच, दोन लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. या पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाया कराव्यात, नागरिकांनीदेखील याकरिता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे व लोणावळा शहराला नशामुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनीदेखील एमडी ड्रग्स व गांजा या विरोधात सक्त कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लोणावळा शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये एमडी ड्रग्सच्या अनेक कारवाया पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही स्थानिक तरुण तर काही मुंबई भागातील तरुणांचादेखील सहभाग असल्याचे समोर आले होते.
खासगी बंगल्यात रेव्ह पार्टीचे प्रमाण वाढले
लोणावळा शहर हे पुणे व मुंबई या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती असलेले शहर आहे. या दोन्ही शहरांमधून तसेच देशाच्या विविध राज्यांमधून पर्यटक या शहरामध्ये येत असतात. निश्चितच त्याचा परिणाम शहरातील वातावरणावर होत असतो. लोणावळा शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी बंगले हे भाडेतत्त्वावर दिले जातात. या बंगल्यांमध्ये अनेक वेळा रेव्ह पार्टी व विविध प्रकारच्या नशेच्या पार्ट्या झाल्याचे उघड सत्य आहे. अनेक वेळा अशा पार्ट्यांवर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे.
नशेच्या खाईत तरुणाई
शहराच्या आजूबाजूचा परिसर हा निर्जन भाग असल्यामुळे या ठिकाणी खासगी बंगले भाडेतत्त्वावर घेऊन त्यामधून गैरव्यवहार केले जातात. मागील आठवड्यातच पोलिसांनी आंतरराष्ट्रीय फसवणूक करणारी टोळी पकडली होती. मागील काळामध्येदेखील अशा अनेक कारवाया शहरात झाले आहेत. लोणावळा शहर व परिसरातील तरुण मुले ही मोठ्या संख्येने बंगलो व्यवसायामध्ये आहेत. त्यामुळे हातामध्ये रोज येणारा रोख पैसा व संगत यामुळे बंगल्यांमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न यामधून केला जातो व तेथूनच या नशेखोरीला सुरुवात होत आहे. अनेक स्थानिक तरुण व काही प्रतिष्ठित मंडळीदेखील कमी वेळात जास्त पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपल्याच आजूबाजूच्या तरुणांना व विद्यार्थ्यांना नशेच्या खाईमध्ये ढकलत आहेत.
चौकाचौकात पानटपऱ्या
अनेक पान टपऱ्यांवर पानांमधून वेगवेगळ्या गुंगी येणाऱ्या पावडरचा समावेश केला जात असल्याची उघड उघड चर्चा शहरात सर्वत्र ऐकायला मिळते. पूर्वी शहर भागामध्ये महत्त्वाच्या एक-दोन चौकांमध्ये असणाऱ्या पानटपर्या आता गल्लोगल्ली झाल्या असून, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच 20 ते 30 वयोगटातील तरुण हे मोठ्या संख्येने या पान टपऱ्यांवर आपला जत्था जमत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
पोलिस प्रशासनाने या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवत लोणावळा शहरामध्ये होणारी एमडी ड्रग्स व गांजासारख्या पदार्थांची खरेदी विक्री रोखण्यासाठी कठोरात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. सोबतच समाज म्हणून प्रत्येक घटकाने यामध्ये लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आपल्या आजूबाजूला काही चुकीचे घडत असल्यास त्याची तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे.
११२ नंबरवर संपर्क करा
लोणावळा व खंडाळा परिसरात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मॅफेड्रॉन किंवा इतर अमलीपदार्थांचे सेवन करू नये. तसेच परिसरात कोणी अमलीपदार्थांची विक्री करताना आढळल्यास त्वरित ११२ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा लोणावळा शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
लोणावळा शहरामध्ये एमडी ड्रग्स याचा वावर वाढत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक तरुण या ड्रग्समुळे व्यसनाधीन होत असल्याची माहिती मागील आठवडाभरामध्ये लोणावळा शहरातील विविध संघटना यांच्यासोबत झालेल्या वार्तालापातून समोर आली आहे. त्या अनुषंगाने सर्व बीट अधिकारी व कर्मचारी यांना सक्त सूचना देण्यात आल्या असून, लोणावळा शहराला ड्रग्समुक्त करण्यासाठी कडक कारवाया केल्या जातील. सोबतच शाळा व महाविद्यालय भागामध्ये जाऊन विद्यार्थी व पालकांचेदेखील प्रबोधन केले जाणार आहे.महेश विधाते, पोलिस निरीक्षक