Lonavala Long Weekend Traffic Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Long Weekend Traffic: लोणावळ्यात लॉंग वीकेंडपूर्वी वाहतूक कोंडीचा धसका; पोलिसांच्या नियोजनावर नागरिकांचा संताप

१५ ऑगस्टच्या सलग सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता; भांगरवाडीपासून खंडाळ्यापर्यंत वाहतूक नियोजनाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पर्यटकांसोबतच स्थानिक नागरिकदेखील मेटाकुटीला आले आहेत. मागील काही आठवड्यांपासून वारंवार शहरामध्ये होत असलेली वाहतूक कोंडी व पोलिसांचे ढिसाळ नियोजन यामुळे लोणावळावासीयांना कोंडीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. येत्या 15 ऑगस्टला जोडून लॉंग वीकेंड आल्यामुळे या सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी शहरामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता शहर पोलिसांनी या लॉंग वीकेंडच्या वाहतुकीचे आतापासूनच योग्य नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.

ठराविक रस्त्यावरच वाहतूक पोलिस नियुक्त

केवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, कुमार चौक, सहारा पूल येथेच लक्ष केंद्रित न करता शहरातील भांगरवाडी, नांगरगाव, वलवन, तुंगार्ली, जुना खंडाळा, खंडाळा या भागातदेखील पोलिस कर्मचारी अथवा वॉर्डन नियुक्त करत त्या भागामधील वाहतूक कोंडी सोडवण्यावर लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. दरवर्षी शहर पोलिस हे लोणावळा नगर परिषद व स्थानिक स्वयंसेवक यांच्यासोबत समन्वय साधत वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे नियोजन पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून करत असतात. यावर्षी मात्र वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे कोणतेही नियोजन योग्य प्रकारे न झाल्यामुळे अगदी पावसाला सुरुवात झाल्यापासून शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात तर या वाहतूक कोंडीने रेकॉर्ड केला. तासनतास वाहने जागेवर थांबून राहत असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. लोणावळा शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांनादेखील याचा त्रास सहन करावा लागतो. स्थानिक नागरिकांना तर अक्षरशः घरातून बाहेर पडणेदेखील जिकिरीचे बनले आहे. रस्त्यावर काही ठराविक भाग वगळता कुठेही पोलिस अथवा वॉर्डन दिसून येत नाहीत.

दंडात्मक कारवाई करा

रस्त्यावर पोलिस दिसत नसल्यामुळे वाहनचालक बेशिस्तपणे गाड्या पुढे नेतात. कोठेही कशाही प्रकारे वाहने उभी केली जातात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये रस्त्यावर अडथळा ठरणारी वाहने उचलण्यासाठी क्रेन सर्विस होती. तसेच, जॅमर लावूनदेखील वाहनांकडून दंड आकारणी केली जात होती. यंदा मात्र, वाहतूक नियंत्रणासाठी कोणतेही उपाययोजना शहर पोलिसांकडून होताना दिसत नाही.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मागणी

भुशी धरणाकडून पुन्हा माघारी येणारी वाहने ही रायवुड येथून जुना खंडाळामार्गे मुंबईच्या दिशेने व हनुमान टेकडीलगतच्या रस्त्यावरून कुसगाव येथे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गे बाहेर काढता येऊ शकतात. त्याकरिता दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहेत. लोणावळा शहरामध्ये येण्यासाठी तसेच बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. मात्र, योग्य प्रकारे दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालक एकाच रस्त्याने ये-जा करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वाहनचालक वाहतूक कोंडीमध्ये वाहने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत कोंडीच्या समस्यामध्ये भर घालत आहेत. अशा वाहनचालकांवरदेखील कारवाई होणे गरजेचे आहे.

15 ऑगस्टला जोडून सलग सुटी आली आहे. या दिवशी लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी राहणार आहे व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा विचार करूनच स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. शहर पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. नगर परिषददेखील पोलिसांना याकरिता सहकार्य करण्यास तयार आहे. या संदर्भातील निवेदन शहर पोलिसांना दिले आहे.
निखिल कवीश्वर, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT