लोणावळा: लोणावळा शहरामध्ये ६ जुलै रोजी झालेल्या पूरपरिस्थितीला टाटा कंपनीचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप लोणावळा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला. टाटा कंपनीच्या मान्सून लेकमधून लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे दोन हजार कुटुंब बाधित झाली आहेत. या कुटुंबाच्या नुकसानीला टाटा कंपनीच जबाबदार असून, त्यांनी नागरिकांचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने केली आहे.
टाटा कंपनी मात्र कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई देण्यास तयार नसल्याने आज लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, आरोग्य समितीच्या सभापती धनंजय काळोखे, पाणी समितीचे सभापती जीवन गायकवाड, नगरसेवक निखिल कवीश्वर व सर्वच नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली लोणावळ्यातील नागरिकांचा टाटा कंपनीच्या विरोधात मंगळवारी (दि. २८) रोजी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
लोणावळा शहरात जोरदार पाऊस सुरू असताना या पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टाटा कंपनी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढत त्या ठिकाणी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लोणावळा शहरामध्ये झालेल्या पूर परिस्थितीला टाटा कंपनी जबाबदार आहे. टाटा कंपनीने ही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी लोणावळा नगर परिषदेच्या वतीने तसेच लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनामध्ये लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पूरग्रस्त भागातील नागरिक सहभागी झाले होते. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलनकर्त्यांनी टाटा कंपनीच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर टाटा हायड्रा कंपनीचे मुख्य अधिकारी अजय कोण्णूर व इतर अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार टाटा कंपनी करत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये तालुक्याचे आमदार व जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह
टाटा कंपनीच्या विरोधामध्ये लोणावळा नगरपरिषदेने पुकारलेल्या आंदोलनाला लोणावळा शहरातील राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र, आंदोलनादरम्यान लोणावळा नगरपरिषद लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांचे अध्यक्ष यांच्यामध्ये आंदोलनावरून वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळाले. आंदोलन शांततेच्या मार्गाने असल्यामुळे नगरपरिषद लोकप्रतिनिधी मुंबई-पुणे रस्त्यावरच थांबून घोषणाबाजी व भाषणबाजी करत होते तर मनसे व इतर राजकीय पक्ष मात्र टाटा कंपनीच्या कार्यालयावरती मोर्चा घेऊन जाण्याची मागणी करत होते. यावरून या आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद व मतप्रवाह निर्माण झाले होते.
लोणावळा नगरपरिषदेच्या प्रमुख मागण्या
पूरग्रस्त कुटुंबाला टाटा कंपनीने एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.
इंद्रायणी नदीच्या दुतर्फा टाटा कंपनीने आरसीसी भिंत बांधून द्यावी.
टाटा कंपनीने सीएसआर फंडातून लोणावळा नगरपरिषदेला दरवर्षी एक कोटी रुपये द्यावेत.
एनडीआरएफच्या धर्तीवर टाटा कंपनीने एक रेस्क्यू पथक तयार करावे, ज्यामध्ये पाच बोटी व किमान १५ ते २० प्रशिक्षित कर्मचारी असावेत.
टाटा कंपनीच्या अधिकृत विमा कंपनीकडून लोणावळ्यातील नागरिकांना विमा संरक्षण मिळावे.