Lonavala Municipal Election Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Municipal Election: लोणावळा निवडणूक; कोट्यवधींची उधळपट्टी, तरीही विजयाबाबत धाकधूक

पैशांच्या जोरावर लढलेली निवडणूक; स्थानिक प्रश्नांना बगल, उमेदवारांमध्ये निकालापूर्वीच प्रचंड अनिश्चितता.

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडली. यावर्षीची निवडणूक मागील अनेक निवडणुकांपेक्षा वेगळी होती. या वर्षीची निवडणूक विकासाच्या मुद्द्‌‍यावर कमी व पैशांच्या मुद्द्‌‍यावर जास्त चर्चेत राहिली. पाण्यासारखा पैसा या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी खर्च केला. काहीजण अभिमानाने सांगत आहेत की जागा विकली, प्लॅट विकला, दुकाने विकली, एवढे पैसे खर्च झाले, तेवढे पैसे खर्च झाले मात्र किती मतांनी निवडून याल असे विचारले तर मात्र अजूनही धाकधूक कायम आहे, मतदारांनी आत जाऊन काय केलंय हे 21 डिसेंबरला निकालाच्या दिवशी समजेल, असे उत्तर मिळत आहे. त्यात कोणी म्हणतंय तुम्हीच विजयी होणार, असे सांगणारा भेटला तर जिवात जीव आल्यासारखे वाटते असे काही जण मजेने सांगत आहेत.

2 डिसेंबर रोजी मतदान झाले. मात्र, लोणावळ्यातील दोन जागांचे मतदार 20 डिसेंबर रोजी होणार असल्यामुळे सर्व निकाल 21 डिसेंबरला घोषित केला जाणार आहे. मतदानानंतर तब्बल 19 दिवसांनी निकाल लागणार असल्याने शहरामध्ये सध्या झालेल्या मतदानाविषयी सर्वत्र खरमरीत चर्चा ऐकायला मिळत आहे. ज्या उमेदवारांचे ज्या कार्यकर्त्यांनी काम केले आहे ते ठामपणे आपलाच उमेदवार विजयी होणार, असे सांगत असले तरी प्रत्यक्ष निवडणूक लढवणारा उमेदवार मात्र विजय आपलाच होणार हे खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. हीच या निवडणुकीमधील खरी गंमत व पैशामुळे आलेला ट्विस्ट असल्याचे बोलले जात आहे.

पैशाने घेतला अधिकार हिरावून

महिलांना देवदर्शन, देवदर्शनाच्या नावाखाली महिलांना शपथा घ्यायला लावणे, महिलांना गिफ्ट वाटप, साड्या वाटप असे प्रकार या निवडणुकीमध्ये करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आमिषे दाखवत तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपलेसे करून निवडणुका जिंकण्याचा फंडा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. सोबतच प्रत्येक मताला पैसे वाटप झाले असल्याचे उघड सत्य आहे, मात्र त्याची कोठेही जाहीर वाच्चता होत नाही. त्यामुळे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेली मतदान प्रक्रिया व आपला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडण्याचा सर्वसामान्य नागरिकांना असलेला अधिकार पैशाच्या जिवावर काही लोक हिरावून घेत असल्याचे या निवडणुकीमध्ये प्रखरतेने जाणवले.

मतदारांचे हक्काचे मत व त्यांचा आत्मसन्मान विकत घेण्याचा प्रयत्न अनेक स्वार्थी राजकारण्यांनी केला आहे. त्यामुळेच कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील विजयाची खात्री ते बाळगू शकत नाहीत. हेच लोकशाहीचे खरे यश असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक सजग नागरिकांनी मतदान करताना आपण आपला लोकप्रतिनिधी पाच वर्षांसाठी निवडून देत आहोत व तो आपल्या प्रभागाच्या विकासाला बांधील राहील असाच विचार करून मतदान केले असावे, असे देखील अनेक जाणकार नागरिक सांगत आहेत.

स्थानिक प्रश्नांना बगल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या खरेतर स्थानिक प्रश्नांवर व प्रभागातील समस्यांच्या मुद्द्‌‍यांवर लढवल्या जातात. लोणावळा असो अथवा मावळ तालुका या ठिकाणी निवडणुकीची तयारी करणारे अनेक उमेदवार मागील अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर काम करत आहेत. नागरिकांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर राहिले आहेत, असे असताना निवडणुकांच्या काळामध्ये अचानक काही पैशावाल्यांनी निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. कोणतेही सामाजिक कार्य नाही, नागरिकांच्या समस्यांचे काही देणे-घेणे नाही, फक्त पैसा फेको व तमाशा देखो अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये वारेमाप पैशाचा वापर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT