लोणावळा: लोणावळा नगर परिषदेकडून शहरात सातत्याने स्वच्छता अभियान राबवले जाते. दोन दिवसांपूर्वीदेखील नगर परिषद व संत निरंकारी ट्रस्ट यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवत शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता अभियानाला जेमतेम दोन दिवस झालेले असताना शहरातील शांती चौकामध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. एक प्रकारे नागरिकांनी नगर परिषदेच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
मागील आठवड्यातदेखील मावळा पुतळा चौकापासून काही अंतरावर असलेल्या दुकानाशेजारी असेच मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक व कचऱ्याचे ढीग पाहिला मिळाले. भांगरवाडी, बाजारपेठ भागात काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. रेल्वे विभागात तर सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा पाहायला मिळत आहे. देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यापासून नगर परिषदेने या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत सातत्याने दरवर्षी नामांकने प्राप्त केली आहेत.
एकेकाळी कचऱ्याचे ढीग व त्यावरून तासंतास सभागृहामध्ये होणारे वादविवाद लोणावळाकर नागरिकांनी पाहिले आहेत. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने स्वच्छता अभियानामध्ये भरघोस कामगिरी करत लोणावळा शहर कचराकुंडीमुक्त केले. तसेच वेगवेगळे स्वच्छता अभियान राबवत शहराला कचरामुक्त बनवले. त्यानंतर प्रशासकीय कालावधीमध्येदेखील स्वच्छता अभियान पुढे चालू ठेवण्यात आले व आतादेखील नवीन सभागृहाकडून शहराला स्वच्छ ठेवण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. असे असले तरी नागरिकांकडून या स्वच्छता अभियानाला वाटण्याच्या अक्षता दिल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची गरज
लोणावळा शहराला स्वच्छ व सुंदर ठेवणे केवळ लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे काम नाही, तर शहरातील प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्यदेखील आहे. प्रत्येकाने आपला घरामध्ये निर्माण होणारा कचरा आपल्या दुकानांमध्ये व व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा हा रस्त्याच्या कडेला इतरत्र कोठेही न टाकता जी घंटागाडी आपल्या घरापर्यंत, दुकानापर्यंत येते त्यामध्येच टाकणे क्रमप्राप्त आहे. मात्र, वारंवार सूचना देऊन व आवाहन करूनदेखील काही ठिकाणी नागरिक जाणीवपूर्वक कचरा हा रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. नगर परिषदेने यावर अंकुश आणण्यासाठी व स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी व कचऱ्याचे ढीग ज्या ठिकाणी पडत आहेत अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशीदेखील मागणी पुढे येत आहे.
लोणावळा शहरामध्ये स्वच्छता अभियान सातत्याने राबवले जात आहे. नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक संघटना या स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभागी होत आहेत. असे असताना देखील काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पुढील काळामध्ये रस्त्यावर कचरा टाकताना कोणी मिळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच असे प्रकार रोखण्यासाठी ज्या ठिकाणी वारंवार कचऱ्याचे ढीग पडत आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत निर्णय घेतला जाईल.अशोक साबळे, मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद