

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल 1 हजार एमएलडी घरगुती सांडपाणी तयार होत आहे. मात्र, त्यापैकी केवळ 400 एमएलडी पाण्यावर महापालिकेकडून प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित 600 एमएलडी सांडपाणी थेट पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीत सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. परिणामी, नदी पात्रातील पाणी अतिदूषित करण्यात महापालिकेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेकडून पवना नदीतून दररोज 550 एमएलडी पाणी घेऊन ते शुद्ध करून शहराला पुरवले जाते. तसेच, एमआयडीसीकडून दररोज 30 एमएलडी शुुद्ध पाणी विकत घेतले जाते. ते पाणी एमआयडीसी पवना नदीतूनच उचलते. आंद्रा पाणी योजनेतून दररोज 90 एमएलडी पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील बंधार्यातून उचलले जाते. तर, मुळा नदीतून महाापालिका पाणी उचलत नाही. महापालिका असे दररोज एकूण 670 एमएलडी पाणी संपूर्ण शहराला पुरवत आहे. तसेच, काही नागरिक, हाऊसिंग सोसायट्या, बंगलोधारक बोअरींग, विहीर, खासगी टँकर तसेच, पुर्नवापर केलेले पाण्याचा वापर करतात. असे एकूण 1 हजार एमएलडी पाणी दररोज शहवासीयांकडून वापरले जाते. त्यातून तितकेच सांडपाणी तयार होते.
त्यापैकी केवळ 400 एमएलडी सांडपाण्यावर महापालिकेकडून प्रक्रिया केली जात आहे. महापालिकेचे शहरभरात एकूण 423 एमएलडी क्षमतेचे एकूण 22 मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) आहेत. त्यातून दररोज 400 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते, असा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे तब्बल 600 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न होताच नदी पात्रात मिसळत असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या अनेक ड्रेनेजलाईन फुटल्या आहेत. त्यातून सांडपाणी नाले, रस्ते, कच्च्या रस्त्यामार्फत थेट नदीपात्रात मिसळते. नदी काठावरील काही ड्रेनेजलाईन जाणीवपूर्वक फोडल्या जातात, असा आरोप पर्यावरणप्रेमीकडून वारंवार केला जात आहे. तसेच, महापालिकेच्या एसटीपीतून प्रक्रिया न केलेले सांडपाणी रात्रीच्या वेळेत थेट नदीत सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
त्या सर्व कारणांमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत असल्याचे दिसून येत आहे. जलपर्णी फोफावण्याचे ते एक मुख्य कारण आहे. परिणामी, नदी पात्राचे पाणी अधिक दूषित झाले आहे. नद्यांची अक्षरश: गटारगंगा झाली आहे. नदी पात्रातून प्रचंड दुर्गंधी येते. नदी काठच्या परिसराला वर्षभर डासांचा मोठ्या प्रादुर्भाव सहन करावा लागतो. तर, काही भागात पात्रात पांढरा फेस तयार होतो आणि मासे मृत होतात.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहर पिछाडीवर
शहरात प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात मैलासांडपाणी सोडले जात असल्याचे स्वच्छ भारत अभियानाच्या पथकास आढळून आले आहे. त्यामुळे त्या अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गुण मोठ्या प्रमाणात घटतात. परिणामी, अभियानात महापालिकेची कामगिरी सातत्याने ढासळत आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. या अभियानात महापालिकेचा 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात समावेश आहे.
नदी पात्रात प्रक्रिया केलेले 100 टक्के सांडपाणी सोडण्याचे नियोजन
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन 20 एमएलडी क्षमतेचा एका एसटीपीचे सध्या बांधकाम सुरू आहे. एकूण 435 एमएलडी क्षमतेचे 12 एसटीपी बांधण्याचे नियोजन आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमसीसीआयए, एमआयडीसी व महापालिका सीईटीपी बांधण्याचे नियोजन आहे. पात्रातील जलपर्णी तात्काळ काढली जात आहे. एकूण 22 एसटीपीतील प्रकिया केलेले 70 ते 80 एमएलडी पाणी विविध उद्याने आणि औद्योगिक कंपन्यांना वापरासाठी दिले जात आहे. त्यातून महापालिकेस दरमहा 10 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. भविष्यात 100 एमएलडी क्षमतेचा पुनर्वापर, पुनर्चक्रिकरण प्रकल्प उभारुन पिण्यायोग्य पाणी देण्याचे नियोजन आहे. शहरातील मोठ्या 368 हाऊसिंग सोसायट्यांत स्वत:चे एसटीपी सुरू आहेत. उर्वरित 126 सोसाटीत एसटीपी सुरू करुन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रक्रिया न केल्याने जलसंपदा विभागाकडून वर्षाला 10 कोटींचा दंड
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी दिले जाते. पवना आणि आंद्रा धरणातून अनुक्रमे 550 एमएलडी व 90 एमएलडी असे एकून 640 एमएलडी पाणी महापालिकेस दिले जात आहे. त्या पाण्यावर प्रक्रिया करून महापालिकेकडून ते पाणी संपूर्ण शहराला पुरवले जाते. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार जितके पाणी घेतले जाते, तितके पाणी प्रक्रिया करून नदी पात्रात सोडण्याची अट आहे. तसे न केल्यास पाणी दराच्या चौपट दंड केला जातो. महापालिकेकडून केवळ 400 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून महापालिकेस दरवर्षी सुमारे 10 कोटी रुपयांचा दंड केला जात आहे. महापालिकेस जलसंपदा विभागास तब्बल 110 कोटी रुपयांचा दंड भरणे बाकी आहे. दंडाच्या या रक्कमेाबाबत महापालिकेने लवादाकडे धाव घेतली आहे.
एक हजार 574 किलोमीटर अंतराची ड्रेनेललाईन
महापालिकेकडून संपूर्ण शहरात एकूण 1 हजार 574 किलोमीटर अंतराची ड्रेनेललाईन टाकण्यात आली आहे. घरगुती मैलासांडपाणी त्या ड्रेनेजलाईनवाटे जवळच्या एसटीपी केंद्रात नेले जाते. तेथे त्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी नदीत सोडले जाते. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 22 एसटीपी असून, त्यांची क्षमता 423 एमएलडी इतकी आहे. सध्या एकूण 400 एमएलडी मैलासांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे.महापालिकेकडून केला जाणार पाणीपुरवठा-670 एमएलडी बोअरींग, विहीर, खासगी टँकरचे वापरले जाणारे पाणी-330 एमएलडी दररोज सांडपाणी तयार होणारे सांडपाणी-1 हजार एमएलडी महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार पाणी-400 एमएलडी प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळणारे सांडपाणी- 600 एमएलडी