

कामशेत: शहरामध्ये सध्या कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून, डंपिंग ग्राउंडसाठी जागाच नसल्यामुळे कामशेत ग्रुपग्रामपंचायत प्रशासनाला जागेसाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत.
शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साठत असून, त्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायतकडे कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी व्यवस्था नाही. त्यामुळे कामशेत शहर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. अनेक प्रभागातील मुख्य रस्त्यांच्याकडेला कचरा पडलेला दिसत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
शेतीचे नुकसान
मागील अनेक वर्षांपासून कामशेत शहर हे घाणीच्या विळख्यात सापडले आहे. शहरातून जमा होणारा कचरा कोठे टाकायचा हाच मोठा प्रश्न स्थानिक प्रशासनापुढे उभा ठाकला असून, कचऱ्याची विल्हेवाट कशी व कोठे लावायची याचे गणित उद्याप सुटू शकले नाही. ग्रुपग्रामपंचायत कामशेतच्या मालकीची तीन एकर गायरान जमीन ही खामशेत येथे आहे. पूर्वी येथेच कचरा टाकला जात होता, परंतु खामशेतच्या काही शेतकर्यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती. येथील कचर्यामुळे शेतीचे नुकसान होत असून, शेती नापीक होत असल्याने डंपिंग ग्राउंड बंद करण्यात आले आहे. त्यानंतर ग्रामपंचायतने अनेक वेळा ठिकठिकाणी भाडे करारावर जागा घेऊन डंपिंग ग्राउंड केले होते, परंतु याचाही फारसा फायदा झालेला दिसत नाही.
कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात
शहरातील कचरापेटी हटविल्यामुळे अनेक नागरिक उघड्यावर व रस्त्याच्याकडेला रात्रीच्यावेळी कचरा टाकतात. त्यात शिळे अन्न, कुजलेल्या पालेभाज्या, हॉटेलमधील उरलेले अन्न याचा समावेश असल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी परिसरत आहे. तसेच, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कचरा संकलित करण्याकरिता सध्या कायमस्वरूपी जागा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. तात्पुरत्या स्वरूपात आम्ही कृषी खात्याच्या जागेचा वापर करीत होतो; पण तेथेही कचरा टाकणे बंद केले असून, तेथील कचरा लवकरच उचलण्यात येईल. सध्या विकेंडर सोसायटीच्या मागच्या बाजूस जागा उपलब्ध झाली असून, तेथे कचरा साठविण्यात येत आहे. येणाऱ्र्या काळात कामशेत वडिवळे रोडलगत जागा घेऊन तेथे प्लांट निर्माण करण्यात येणार आहे. तसेच, कचऱ्यापासून कंम्पोस्ट खताची निर्मिती करण्यात येणार आहे.
धनंजय देशमुख, ग्रामविकास अधिकारी, कामशेत