लोणावळा: शहरातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या भुशी धरण परिसरात छोटा-मोठा व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या टपरी व स्टॉलधारकांवर रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (दि. 9) कारवाई केली आहे. भुशी धरण हे मध्य रेल्वेच्या मालकीचे आहे. तसेच, धरणाच्या खालील मोकळी जागा हीदेखील रेल्वेच्या मालकीची आहे. केवळ हंगामी स्वरूपाच्या लाकडी बांबू व ताडपत्री लावून तात्पुरत्या टपऱ्या व स्टॉल उभे केले आहेत. असे असतानादेखील रेल्वे प्रशासनाने कारवाई केल्याने लोणावळा शहरात उपोषण करण्यात आले.
विक्रेत्यांनी केला कारवाईचा निषेध
या ठिकाणी मागील 60 ते 70 वर्षांपासून भुशी व रामनगर परिसरामधील स्थानिक नागरिक चहा, वडापाव, मक्याचे कणीस, भजी विक्रीचा व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करत आहेत. या ठिकाणी नागरिकांनी रेल्वेच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम अथवा लोखंडी शेड उभे केलेले नाहीत. केवळ हंगामी स्वरूपाचे स्टॉल उभे केले आहेत. असे असतानादेखील रेल्वे प्रशासनाने केलेली कारवाही ही संतापजनक व निषेधार्थ असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या या कारवाईला भुशी रामनगर या प्रभागाचे नगरसेवक धनंजय काळोखे, सोनाली मराठे व प्रियंका कोंडे यांनी विरोध केला होता. तरीही रेल्वे प्रशासनाने पोलिस बळाचा वापर करत या ठिकाणची दुकाने पूर्णपणे जमीनदोस्त केली. या निषेधार्थ धनंजय काळोखे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सोनाली मराठे व प्रियंका कोंडे यांच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शुक्रवारी (दि. 10) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनामध्ये नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे यांच्यासह नगरसेवक व सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते.
कोणालाही बेरोजगार करू नका
या वेळी नगरसेवक धनंजय काळोखे म्हणाले, की भुशी धरणाच्या परिसरामध्ये व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना बेरोजगार करू नये, हीच आमची मागणी आहे. भुशी धरण हे रेल्वेच्या मालकीचे आहे. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणाचा विकास करत व्यावसायिक गाळे निर्माण करत ते स्थानिकांना भाडेतत्त्वावर द्यावेत; अथवा स्थानिक व्यावसायिकांना त्या ठिकाणी दुकाने लावण्याची परवानगी देत त्यांच्याकडून शुल्क वसूल करावे. मात्र, त्यांना बेरोजगार करू नये.
व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी
नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले, की मागील दोन ते तीन पिढ्यांपासून हे नागरिक भुशी धरणाच्या परिसरामध्ये व्यवसाय करत आहेत. पावसाळा या चार महिन्यांच्या सिझनमध्येच खरंतर यांचा व्यवसाय असतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करत त्यांना भुशी धरणाच्या परिसरात व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी.
भाडेतत्त्वावर दुकाने द्यावीत
सूर्यकांत वाघमारे म्हणाले, की ज्या पद्धतीने रेल्वेने वेगवेगळ्या ठिकाणी दुकाने तयार करून ती भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्याच धर्तीवर भुशी धरण परिसरातदेखील व्यावसायिकांना दुकाने निर्माण करून ती भाडेतत्त्वावर द्यावीत. नगरसेविका सोनाली मराठे व प्रियंका कोंडे म्हणाल्या, की मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी स्थानिक रहिवासी पर्यटनाचा व्यवसाय करत आहेत. रेल्वेच्या कोणत्याही जागेवर त्यांनी पक्के अतिक्रमण केलेले नाही, अथवा कोठेही हक्कदेखील सांगितलेला नाही. केवळ आपला उदरनिर्वाह या ठिकाणी चालवत आहेत. भुशी धरण हे जगप्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी लाखों पर्यटक येत असतात. या पर्यटकांना आमचे स्थानिक व्यावसायिक चांगल्या पद्धतीने सुविधा देतात. तसेच, धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षेची काळजीदेखील घेत असतात. या सर्व बाबींचा विचार करत रेल्वे प्रशासनाने त्यांना पावसाळ्याच्या सिझनमध्ये या ठिकाणी व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
तीव आंदोलनाचा इशारा
लोणावळ्यातील नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी व स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीचे निवेदन आमदार सुनील शेळके व खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमंत्री, रेल्वे व्यवस्थापक यांना देण्यात येणार असल्याचे धनंजय काळोख यांनी सांगितले. आमच्या मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास लोणावळा शहरामध्ये तीव आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.