Bhushi Dam Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Bhushi Dam Overflow: लोणावळ्यात भुशी धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी वाढली, पोलिसांकडून सुरक्षा सूचना

सहारा पूल व धबधब्यांवर पर्यटकांचा ओघ; वाहतूककोंडी टाळण्यासाठी विशेष बैठक, प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा शहरामधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य केंद्र आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेले भुशी धरण शुक्रवार (दि. ३) रोजी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी धरण पूर्ण भरून वाहू लागल्याची बातमी समजताच, पर्यटकांनी धरण परिसराकडे धाव घेत मोठी गर्दी केली होती.

लोणावळा शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. २ जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत शहरात तब्बल ११६ मिली मीटर पावसाची नोंद झाली. यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने नंतर विश्रांती घेतली होती. त्यानंतर ३० जूनपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. सलग चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि शुक्रवारी धरण ओव्हरफ्लो झाले. भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी भुशी धरणावर येत असतात. धरण भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर पाणी वाहते व या वाहत्या पाण्यामध्ये बसून भिजण्याचा आनंद पर्यटक घेत असतात.

धबधबे प्रवाहीत; सहारा पुलावर पर्यटकांची गर्दी

लोणावळा धरणासमोरील डोंगरावरून पांढरे शुभ्र धबधबे खळखळून वाहू लागले आहेत. या निसर्गरम्य वातावरणाचा आणि धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी सहारा पुलावर एकच गर्दी केली आहे. आज सकाळपासूनच पर्यटकांचा ओघ सुरू झाला असून, शनिवार आणि रविवारी वीकेंडला येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष बैठक

शनिवार आणि रविवारी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात लोणावळा शहर पोलीस, नगरपरिषद प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करून वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना

भुशी धरण भरल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा शहर पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. पर्यटन स्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

  • धोकादायक ठिकाणी जाणे टाळा : सेल्फी काढण्याच्या नादात किंवा उत्साहाच्या भरात दऱ्यांच्या कडेला किंवा निसरड्या खडकांवर जाऊ नका.

  • पाण्यात उतरण्याचा मोह आवरा : ओव्हरफ्लो झालेले धरण आणि वेगाने वाहणारे धबधबे दिसायला सुंदर असले, तरी पाण्याचा अंदाज येत नसल्याने धरण किंवा धबधब्यांच्या अति खोल भागात उतरू नका.

  • पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा : पर्यटन स्थळांवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा.

  • वाहतुकीचे नियम पाळा : रस्त्यावर कुठेही वाहने उभी करून वाहतूक कोंडी करू नका. प्रशासनाने ठरवून दिलेल्या पार्किंगच्या जागेचाच वापर करा.

  • हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही : मद्यप्राशन करून पर्यटन स्थळी येणे, हुल्लडबाजी करणे किंवा महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आपला आनंद आणि सुरक्षा आपल्याच हातात आहे, त्यामुळे जबाबदार पर्यटक बनून पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या! असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT