

पिंपरी: मावळ तालुक्यातील पवना धरण परिसर तसेच, पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची दिवसभर संततधार सुरू आहे. मात्र, पवना धरणात पाणी साठ्यात वाढ झाली नसल्याने चिंता कायम आहे. गेल्यावर्षी धरणात तब्बल 63 टक्के पाणीसाठा होता. मात्र, सध्या केवळ 16 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जोरदार पावसाची अपेक्षा केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसह काही नगरपालिका व ग्रामपंचायत यांना पवना धरणातून पाणी पुरवले जाते. यंदा पाऊस लांबल्याने धरणातील पाणी साठा 16 टक्क्यांवर आला आहे. जलसंपदा विभागाने 20 जूनपासून 15 टक्के पाणी कपात लागू केली आहे. तेव्हापासून महापालिकेकडून शहरात तास ते दीड तासाने कमी पाणी दिले जात आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, दोन ते तीन दिवसांपासून शहरासह मावळ तालुका परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, पावसाचा दमदार जोर नसल्याने धरण क्षेत्रात पाणी साठा होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 30 मिलीमीटर पावसाळची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 199 मिलीलीटर पाऊस झाला आहे.
पवना धरणात गुरूवारी (दि.2) दुपारी चारपर्यंत 16.96 टक्के पाणी साठा होता. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात तब्बल 62.91 टक्के जलसाठा होता. त्यामुळे मावळ तालुक्यासह शहरात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकर्यांसह शहरवासीयांना लागली आहे.