पिंपरी: दिवाळीच्या आनंदपर्वाची सुरुवात झाली असून, संपूर्ण शहर रोषणाईने उजळून निघाले आहे. समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीदेवतेच्या पूजेसाठी शहर सज्ज झाले आहे. या दिवशी घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी गर्दी झाली होती. (Latest Pimpri chinchwad News)
व्यापारी, संस्थांमध्येही लक्ष्मीपूजाच्या दिवशी विधिवत पूजन करण्याची परंपरा आहे. यासाठी बाजारपेठेत लाह्या, बत्तासे, बोळके, झेंडूची फुले, यांसह चोपडी, राजेमेळ इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत्या.
या दिवशी स्टेशनरी, भुसार बाजार, कारखाने, सराफी पेढ्या, शोरूम्स विविध कार्यालयामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. त्यासाठी दुकाने, कार्यालयांच्या स्वच्छतेसह सजावट करण्यात आली आहे.
सध्या संगणकाचे युग असले तरी लक्ष्मी पूजनासाठी पारपंरिक पद्धतीने चोपडी, बिल बुक, रोजमेळ, पेन यांच्यावर शुभ संदेश लिहून पूजा केली जाते. नागरिकांसह व्यापाऱ्यांची लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीचा फोटो, अगरबत्ती, धूप, कापूर, हळदी - कुंकु, खारीक, खोबरे, सुपारी, बदाम, ऊस, केळीचे खुंट, आंब्याची पाने, विविध प्रकारची फुले घेण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती.