

पिंपरी : दोन वर्षांपासून फरारी असलेल्या दोघा भावंडांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. या दोघांनी कंपनी मालकाचा विश्वास संपादन करून तब्बल 84 लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.(Latest Pune News)
मोशी येथील ‘द किचन स्टोरी’ या कंपनीत कार्यरत असलेले आरोपी राहुलकुमार जितेश तिवारी (29, रा. पडरी, ता. सलोनपूर, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) आणि त्याचा भाऊ रोहितकुमार जितेश तिवारी (29, रा. जि. देवरिया, उत्तर प्रदेश) यांनी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार करून मालकाची फसवणूक केली.
फसवणूक उघडकीस आल्यानंतर हे दोघे उत्तर प्रदेशात पसार झाले होते. या प्रकरणी द किचन स्टोरी’ कंपनीच्या मालकांनी 16 ऑगस्ट 2023 रोजी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते.
दरम्यान, एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सातत्यपूर्ण तपास व तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. जयपूर (राजस्थान) येथे सापळा रचून पोलिसांनी दोन्ही भावंडांना ताब्यात घेतले. सध्या त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.