कामशेत: लक्ष्मी पूजनानिमित्त कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक लक्ष्मीच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. विकेत्यांनी लक्ष्मीच्या विविध रुपातील मूर्ती या विक्रीकरीता ठेवल्या असून, नागरिक लहान मूर्ती खरेदीस प्राधान्य देत आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच पूजेस लागणारे लाह्या, बत्ताशे, मातीची रंगीबेरंगी बोळकी, रांगोळ्या, पणत्या, सुवासिक धूप आदी पूजेचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. 100 रुपयांपासून 250 पर्यंत मूर्ती विक्रीस आहेत. लक्ष्मी मूर्तींमध्ये सजावटीवर अधिक भर दिसून येत आहे. पूर्वी मातीची एकच साचाबद्ध डोक्यावर दिवे असलेली मूर्ती बाजारात दिसायची. आता मात्र मूर्तींमध्ये वैविध्य दिसून येत आहे.
यामध्ये कमळारूढ, सिंहासनस्थ, उभी अशा लक्ष्मी मूर्ती दिसत आहेत. त्यासोबतच मूर्तीवर सजावट कामावर भर देण्यात येतो. लक्ष्मीच्या डोक्याला गंगावन, डोक्याला बिंदी, कानातले, नाकातले खरोखरचे दागिने, साडीवर टिकल्या जरी लावून केलेले काम अशा मूर्ती विक्रीस असून, त्यांची किंमत अधिक आहे. मात्र, आकर्षक असल्याने त्यांना मागणीही चांगली आहे.
झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक
बाजारात यंदा झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, पिवळा व भगवा झेंडू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे . यंदा कामशेत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडू विक्रीस आल्यामुळे याचे दर कमी झाले आहेत. 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने फुले विक्रीस आहेत.
बालचमुंनी साकारले किल्ले
दीपावलीनिमित्त आपल्या कला गुणांची चुणुक दाखवित बाल गोपाळांनी इतिहास जोपासण्यात आपली शक्कल लावीत काल्पनिक किल्ले बनविले आहेत. इतिहासकालीन किल्ल्यांचे प्रतिरूप साकारण्याचा प्रयत्न मुलांनी केला आहे. आजच्या या मोबाईलच्या युगात लहान मुले पारंपारीक इतिहासाचा वारसा जोपासताना दिसत आहेत.
कामशेतमधील इंद्रायणी कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, कुसगाव रोड या ठिकाणी मुले किल्ले बनविताना दिसत आहेत. मावळात गड किल्ल्यांचा वारसा असून हे हुबेहुब किल्ले बनविताना मुले दिसत आहेत. किल्ल्यांविषयीचे ज्ञान व शिक्षण आजही बाल मनावर ठसा उमटविताना पहावयास मिळत आहे.