

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष्मीपूजनासाठी केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. परिणामी फुलांचे चढ्याने असलेले दर एकदमच खाले उतरले. ऐन सणासुणीच्या काळात भाव खाणाऱ्या झेंडूचे दर चक्क 30 ते 50 रूपये किलोवर आले होते. त्यामुळे बाजारात विक्रेते ग्राहकांना जास्त फुले खरेदी करण्याचा आग्रह करत होते. (Latest Pimpri chinchwad News)
दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. पुजेसाठी, हार करण्यासाठी किंवा रांगोळीसाठी मोठ्या प्रमाणावर झेंडू खरेदी केला जातो. बाजारात झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. केशरी व पिवळ्या रंगाचा झेंडू, शेंवती, अस्टर फुलांनी बाजारपेठ फुलून गेली होती. दरवर्षी लक्ष्मीपूजनामुळे फुलांच्या भावात वाढ होत असते. साधारणपणे 100 ते 150 रुपये दराने झेंडूची फुले विकली जातात. यंदा मात्र झेंडूची फुले 30 रुपयांपासून किलो भावाने विक्री केली जात होती.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये ग््रााहकांना झेंडूची फुले 80 ते 120 रुपये किलोने ग्राहकांना विकत घ्यावी लागली होती. मात्र, लक्ष्मीपूजनानिमित्त फुलांचे भाव एकदम उतरल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यंदा लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली. त्यामुळे फुलांचे दर घसरले आहेत. आम्हांला फुलांचा दर 70 ते 80 रूपये अपेक्षित होता; परंतु 30 रुपयांपासून दर मिळाला. मोशी फुलबाजारात शंभर रूपयाला 10 किलो या दराने झेंडूच्या फुलांची विक्री झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने माल विकणेही गरजेचे होते.
राजकुमार मोरे (अध्यक्ष, पिंपरी - चिंचवड फुलबाजार आडते संघ)