Sleeper Cell Pudhari
पिंपरी चिंचवड

Lawrence Bishnoi Gang Sleeper Cell: लॉरेन्स बिष्णोई गँगचे ‘स्लीपर सेल’ सक्रिय; पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान

सोशल मीडियातून तरुणांची भरती, झटपट पैसा व परदेशी आमिष; दीड हजारांहून अधिक तरुण नेटवर्कमध्ये असल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: देशभरात दहशत निर्माण करणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगचे स्लीपर सेल आता सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. पिंपरी-चिंचवडमधील रावेत गोळीबार प्रकरणानंतर या टोळीचे नेटवर्क किती खोलवर रुजले आहे, याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना दरमहा 15 ते 20 हजार रुपये मानधन, झटपट पैसा आणि परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून विविध शहरांतून भरती केले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पंधरा ते वीस हजारांच्या मानधनावर भरतीचा संशय; सोशल मीडियातून टार्गेटिंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गँग बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांना लक्ष्य करते. सोशल मीडियावर गँगस्टर्सचे व्हिडिओ, रील्स, हत्यारांचे प्रदर्शन आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्टच्या माध्यमातून तरुणांना प्रभावित केले जाते. या पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या तरुणांशी नंतर गुप्त संपर्क साधला जातो. सुरुवातीला किरकोळ कामे देऊन त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर रेकी, वाहनांची व्यवस्था, शस्त्रांची ने-आण किंवा आश्रय देण्यासारख्या कामांत त्यांचा वापर केला जातो. रावेत गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची पार्श्वभूमी तपासताना त्यांच्यावर यापूर्वी कोणतेही गंभीर गुन्हे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मिसळून राहणारे असे स्लीपर सेल शोधणे पोलिसांसाठी अधिक कठीण बनले आहे. विद्यार्थी, डिलिव्हरी बॉय, चालक, हॉटेल कर्मचारी किंवा कामगार अशा स्वरूपात हे तरुण शहरात राहत असल्याने त्यांच्यावर संशय घेतला जात नाही. त्यामुळे आगामी काळात लॉरेन्स बिष्णोई गँगचे वाढते नेटवर्क रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

चेन बेकिंग सिस्टीममुळे तपासात अडथळे

लॉरेन्स बिष्णोई गँगची कार्यपद्धती अत्यंत गोपनीय असल्याचे तपासात समोर आले आहे. चेन बेकिंग सिस्टीममुळे एका व्यक्तीला दुसऱ्याची माहिती नसते. रेकी करणारा, शस्त्रे पोहोचवणारा आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारा अशा वेगवेगळ्या साखळ्यांमध्ये काम विभागले जाते. त्यामुळे एखादा आरोपी पकडला तरी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी अवघड ठरते. इंटरनेट कॉलिंग, व्हर्च्युअल नंबर आणि एन्क्रिप्टेड ॲप्सचा वापर करून संवाद साधला जात असल्याने तपास अधिक क्लिष्ट होत असल्याचे तपास अधिकारी सांगतात.

गँगसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड सुरक्षित आश्रयस्थाने?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर हा आयटी, शिक्षण आणि औद्योगिक केंद्र असल्याने येथे विविध राज्यांतील मोठ्या प्रमाणावर तरुण वास्तव्यास आहेत. गर्दीत सहज मिसळून राहता येत असल्याने अशा शहरांचा वापर स्लीपर सेलसाठी सुरक्षित आश्रयस्थाने म्हणून केला जात असल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. व्यावसायिक, बिल्डर आणि उद्योगपतींना लक्ष्य करून खंडणी उकळण्याचे प्रकारही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संघटित नेटवर्कप्रमाणे कार्यपद्धती

लॉरेन्स बिष्णोई गँगकडून स्लीपर सेलमध्ये सहभागी करण्यात आलेल्या तरुणांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यापूर्वी नियोजनबद्ध प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. सुरुवातीला त्यांची मानसिक तयारी केली जाते. त्यानंतर रेकी कशी करायची, पोलिसांच्या नजरेत न येता संपर्क कसा ठेवायचा, शस्त्रे कशी हाताळायची, पळून जाण्याचे मार्ग आणि सुरक्षित ठिकाणांचा वापर याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येकाला मर्यादित माहिती दिली जाते, त्यामुळे मुख्य सूत्रधार कायम पडद्याआड राहतो. गुप्त नेटवर्क, एन्क्रिप्टेड संवाद आणि स्वतंत्र साखळ्यांवर आधारित ही कार्यपद्धती सुरक्षा यंत्रणांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे.

स्लीपर सेलमध्ये दीड हजार तरुण असल्याचा संशय

सध्या दीड हजारांहून अधिक तरुण लॉरेन्स बिष्णोई गँगच्या स्लीपर सेल नेटवर्कमध्ये सक्रिय असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. झटपट पैसा, सोशल मीडियावरील प्रभाव आणि परदेशात पाठवण्याच्या आमिषामुळे अनेक तरुण या जाळ्यात अडकत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, या तरुणांपैकी अनेकजण प्रथमच गुन्हेगारीकडे वळलेले असतात. त्यामुळे त्यांना केवळ आरोपी म्हणून न पाहता मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समुपदेशन, रोजगार आणि पुनर्वसनाची गरज निर्माण झाली आहे. तरुणांचे वाढते आकर्षण सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनत आहे.

सोशल मीडियातून सुरू होते जाळे

  • फेसबुक, इंस्टाग््रााम आणि व्हॉट्‌‍सॲपद्वारे तरुणांशी संपर्क

  • गँगस्टर्सचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्स आणि पोस्टचा वापर

  • बेरोजगार तरुणांना झटपट पैशांचे आमिष

  • सुरुवातीला रेकी, वाहन व्यवस्था, आश्रय यांसारखी कामे

  • फेक आयडी आणि गुप्त संपर्क माध्यमांचा वापर

  • हळूहळू गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग वाढवला जातो

पोलिसांसमोरील मोठी आव्हाने

  • आरोपींची पूर्वी गुन्हेगारी नोंद नसणे

  • सामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळून राहणे

  • प्रत्येक साखळी वेगळी असल्याने मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे कठीण

  • एन्क्रिप्टेड ॲप्स आणि व्हर्च्युअल नंबरचा वापर

  • राज्यांच्या सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था

रावेत प्रकरणाच्या तपासात आरोपींना स्थानिक स्तरावर काही मदत मिळाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियातून तरुणांना टोळीत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे का? याचाही तपास सुरू आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना तत्काळ कळवावे.
शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT