लोणावळा: मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक येथील कारके वस्तीमध्ये पत्नीच्या डोक्यात व शरीरावर दगड आणि विटांनी मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २१) घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या पतीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे लोणावळा रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान कारकेवस्ती, कुसगाव बुद्रुक येथे दगडू रामू वाघमारे (वय ४५) याने अज्ञात कारणावरून पत्नी काळी दगडू वाघमारे (वय ४०) यांच्या डोक्यात तसेच शरीरावर दगड व विटांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
तपासादरम्यान आरोपी कर्नाटक राज्याच्या दिशेने रेल्वेने पसार होण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करुन पोलिसांनी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करत दगडू रामू वाघमारे याला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची
कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे आदी सहभागी होते.
तीन स्वतंत्र तपास पथके केली होती तयार
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनेनंतर आरोपी दगडू वाघमारे पसार झाला होता. आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक भूषण माने आणि महिला सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांकडूनही माहिती घेण्यात आली.