पिंपळे गुरव: नवी सांगवीतील वर्दळीचा मानला जाणारा कृष्णा चौक सध्या अनधिकृत भाजीविक्रेते आणि वाढत्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. सिग्नलच्या अगदी शेजारीच रस्त्यावर मांडला जाणारा भाजीपाला, हातगाड्या, पथारीवाले यामुळे वाहनांसाठी अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी होत आहे. परिणामी सिग्नल सुरू असतानाही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक मंदावते विशेषतः संध्याकाळच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट बनत आहे.
कृष्णा चौक परिसर आधीच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा मानला जातो. मात्र, वाढत्या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून, विक्रेत्यांनी केवळ कडेला नव्हे तर थेट रस्त्याच्या मध्यभागापर्यंत अतिक्रमण केल्याचे दिसून येते. यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. पदपथांवरही विक्रेत्यांनी कब्जा केल्याने पादचारी मार्ग जवळपास नसल्यासारखाच आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
अत्यावश्यक सेवांनाही याचा फटका बसत असून, अनेकदा रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या या कोंडीत अडकून पडत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे किरकोळ अपघातांची शक्यताही वाढली आहे. विशेष म्हणजे कृष्णा चौकापासून काही अंतरावर साई चौक येथे अधिकृत भाजीमंडई उपलब्ध असतानाही अनेक फेरीवाले चौकातच व्यवसाय थाटत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. स्थानिकांच्या मते वाहतूक पोलिस आणि अतिक्रमण विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच विक्रेत्यांचे धाडस वाढत आहे.
ठोस उपाययोजनांची मागणी
कृष्णा चौकातील वाढती अतिक्रमणे लक्षात घेता सिग्नल परिसर तातडीने मोकळा करणे, फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांना अधिकृत मंडईत स्थलांतरित करणे तसेच नियमित वाहतूक पोलिस तैनात करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. केवळ तात्पुरत्या कारवाईवर न थांबता कायमस्वरूपी उपाययोजना राबविल्यासच वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कृष्णा चौकात हातगाडी व पथारीवाल्यांवर दररोज कारवाई केली जाते. आम्ही कारवाईसाठी गेल्यावर तात्पुरते निघून जातात नंतर पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसतात. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईलराजू कांबळे, कार्यालयीन अधीक्षक, ह क्षेत्रीय कार्यालय, मनपा
साई चौकात पालिकेने अधिकृत भाजी मंडई बांधली आहे. मग हे विक्रेते रस्त्यावर का बसतात. स्वस्त भाजीच्या नादात नागरिकही रस्त्यावर गाड्या उभ्या करतात ज्यामुळे कोंडीत भर पडते. काही विक्रेते खासगी टेम्पोमधून भाजी विकतात. अतिक्रमणाची गाडी आली की ते लगेच निघून जातात. वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी.संजय मराठे, अध्यक्ष लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केट, साई चौक