

आकुर्डी: मुंबई-पुणे महामार्गावरती निगडी ते पिंपरी, दापोडीदरम्यान महापालिकेमार्फत अनेक विकासकामे, मेट्रोमार्फत विविध कामे सुरू असून, या कामांमुळे वाहनचालकांना रस्त्यावरील खडी, खड्डे व धुळीचा सामना करावा लागत आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक मंदावली असून वाहनचालक त्रस्त आहेत.
महापालिका प्रशासनामार्फत अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, वाहनचालक व प्रवाशांना कसरत करत रस्ता पार करावा लागतो. अशातच महामेट्रो व निगडी ते दापोडी बंद वाहिनी, हरित सेतू प्रकल्प, बीआरटी मार्ग ग््रेाड सेपरेटरमध्ये रस्ता दुभाजकांची कामे व रंगरंगोटी आदी कामे सुरू आहेत. ही विकासकामे करताना रस्त्याची ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील आकुर्डी- चिंचवड रस्ता पूर्णपणे अरुंद व खराब झाल्यामुळे रस्ता समतल व दुरुस्त करण्याची मागणी सर्वसामान्य प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे. पालिका प्रशासनाने शक्यतो सातत्याने वाहतूक असणारा मार्गाची डागडुजी, दुरुस्ती व डांबरीकरण रात्रीच्या वेळी करावे, अशी मागणी वाहनचालकाकडून होत आहे. चिंचवड स्टेशनवरून पिंपरीकडे येताना रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गाने प्रथमच प्रवास करणाऱ्यांच्या हे खड्डे लक्षात येत नसल्याने वाहनचालकांना अपघात घडत आहेत. यामुळे रस्त्याची डागडुजी गरजेची आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
निगडीपासून चिंचवडपर्यंत रस्ता अरुंद व खराब होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चकाऱ्या पडल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर सर्वत्र बारीक खडी पसरल्याने अनेक वाहनचालक घाबरत-घाबरत वाहने चालवितात. कच, खडी तसेच रस्त्याची साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ साचल्याने वाहने गेली की धूळ दुचाकीचालक, पादचारी यांच्या नाका तोंडात जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात व नाकात धूळ जाऊन श्वसनाच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यातच रस्त्यावर सर्वत्र बारीक खडी पडल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतात.
मोरवाडी चौक ‘आऊट ऑफ कंट्रोल’
मोरवाडी चौकात वाहतूक नियंत्रण अधिकारी असतानाही वाहनचालकांकडून नियमांना तिलांजली देत बेशिस्तपणे वाहने चालवली जातात. मोरवाडी चौकात सातत्याने चारही बाजूंनी वाहतूक नियंत्रण अधिकारी असताना बेशिस्त वाहनचालक मिळेल तसा मार्ग काढत प्रवास करतात. एकीकडे पुणे महामेट्रोच्या पीसीएमसी बस स्थानकालगत कुठल्याही प्रकारची वाहन पार्किंगची सुविधा नसताना मेट्रोचे प्रवास करणारे प्रवासी वाहने पार्क करून जातात, मात्र ‘नो पार्किंग’ त्या नावाखाली तात्काळ वाहतूक अधिकारी वाहने उचलताना दिसतात. रोज या ठिकाणाहून असंख्य वाहने हमखास वाहतूक अधिकारी उचलून नेताना दृष्टीस पडतात. मात्र, यावर कोणताही योग्य पर्याय शोधला जात नाही अथवा पर्याय दिला जात नाही.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरती निगडीपासून चिंचवडपर्यंत पुणे महामेट्रोमुळे रस्ता खड्डेमय व अरुंद झाला आहे. यात चिंचवडपर्यंत चार ते पाच वाहतूक सिग्नल आहेत. वाहनचालकाच्या बेशिस्तपणामुळे चौकामध्ये वाहतूक अधिकारी असतानाही वाहतूक नियमांचे पालन न करता सिग्नल तोडणे, रश ड्रायव्हिंग करणे, ट्रिपल सीट जाणे, असे सर्रासपणे घडत असताना दिसते. त्यामुळे आमच्यासारख्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना झेबा क्रॉसिंगवरून रस्ता पार करताना भीतीदायक वातावरण निर्माण होते. याकडे वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी.
बाबासाहेब जगदाळे, ज्येष्ठ नागरिक