

पंकज खोले
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील अनेक भाग हे पथदिव्यांअभावी अंधारात बुडालेले असतात; तर काही ठिकाणी पालिकेकडून खोदकाम करण्यात येत असल्याने पथदिवे बंद आहेत. हे पथदिवे सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात एमआयडीसीच्या अनेक भागात सायंकाळी सातनंतर अंधार पसरलेला असतो. परिणामी, या ठिकाणी ये जा करणारे कामगारांना येथून रात्रीच्या वेळी ये-जा करताना असुरक्षितता जाणवते.
शहरामध्ये चिंचवड, भोसरी, चिखली आणि तळवडे या ठिकाणी कंपन्या आहेत. एमआयडीसीतील सार्वजनिक रस्ते आणि पथदिव्यांची मालकी ही पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे आहे. अनेक कंपन्यात तिन्ही पाळीत काम चालते. कामगारांना सक्षम अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी वाहनांवर अथवा स्वतःचे दुचाकी वाहनाने कंपनी गाठावी लागते. अनेक कामगार हे कामाच्या ठिकाणी पायी येतात. अशा कामगारांना रात्रीच्यावेळी येथील अंधाऱ्या परिसरातून जाताना असुरक्षित जाणवते. काही ठिकाणी कामगारांना लुटण्याच्याही घटना घडल्या आहेत.
असुरक्षितता अन् अनुचित प्रकार
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक कंपन्यांच्या परिसरात अपुरी प्रकाशव्यवस्थेमुळे अनेक कंपन्यांनी स्वतःहून प्रवशद्वार व रस्त्यावर पार्किंगच्या ठिकाणी दिवे बसवले आहेत. मात्र, रात्री सातनंतर अनेक ठिकाणी अंधार असल्याने तेथून कामगारांना विशेषतः महिला कामगारांना असुरक्षित वाटते. काही बंद पडलेल्या कंपन्या परिसरात अनेकदा गुदुर्ल बसलेले असतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.
उद्योग सोडून समस्यांशी सामना
उद्योजकांच्या विविध 10 ते 12 समस्या आहेत. त्यापैकी मुख्य रस्त्यावर पथदिवे नसल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेने स्वतंत्र उद्योग सुविधा कक्ष सुरु केला आहे. समस्या सोडविण्यासाठी उद्योग प्रतिनिधी आणि क्षेत्री अधिकाऱ्यांमध्ये दरमहा बैठकीचे आयोजन केले जात होते. त्यामध्ये रस्ते आणि पथदिवे समस्यांबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या; मात्र, अद्यापपर्यंत त्याची दखल घेतली नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे
एमआयडीसी परिसराील समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत असतो. कंपनींच्या संघटनेचे प्रतिनिधी संपर्कात असतात. त्यामुळे अशा तक्रारी आम्ही तातडीने सोडवतो. तरी, पुन्हा एमआयडीसी परिसराची पाहणी करून पथदिवे दुरुस्ती करण्यात येतील
माणिक चव्हाण, सह शहर अभियंता, विद्युत विभाग