Kasarwadi Underpass Damage Pudhari
पिंपरी चिंचवड

Kasarwadi Underpass Damage: पूर ओसरला, पण संकट कायम! कासारवाडीतील शंकरवाडी भुयारी मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात

पुरामुळे डांबरी रस्ता उखडला, पुलाची संरक्षक भिंत कोसळली; वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

वल्लभनगर: कासारवाडी परिसरात नुकत्याच आलेल्या महापुराचे पाणी ओसरले असले, तरी पुरामुळे झालेल्या नुकसानीचे परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. शंकरवाडी येथील रेल्वे भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, खड्डे आणि कोसळलेल्या पुलाच्या भिंतीमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

पूरस्थितीदरम्यान हा भुयारी मार्ग तब्बल दोन ते तीन दिवस पूर्णपणे पाण्याखाली होता. पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर रस्त्यावरील डांबरीकरण मोठ्या प्रमाणात उखडले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यावर माती पसरल्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना विशेषतः दुचाकीस्वारांची मोठी तारांबळ उडत आहे.

शंकरवाडी आणि कासारवाडी परिसराला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. दिवसभर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना सतत अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी हा धोका आणखी वाढतो. दरम्यान भुयारी मार्गालगत असलेल्या पुलाची संरक्षक भिंतही पुराच्या पाण्यामुळे कोसळली आहे.

त्यामुळे रस्त्याची दुरवस्था आणि पडलेली भिंत यामुळे या मार्गावरील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता महापालिका प्रशासनाने तातडीने भुयारी मार्गातील राडारोडा हटवावा, खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच कोसळलेल्या पुलाच्या भिंतीची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शंकरवाडी-कासारवाडी भुयारी मार्गातील रस्ता वारंवार उखडत असतो. सध्या पावसामुळे दुरुस्तीचे काम करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच नाल्याची भिंतही बांधण्यात येणार आहे.
सुनील दांगडे, उप अभियंता, स्थापत्य, ह क्षेत्रीय कार्यालय, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT