नवी सांगवी : कासारवाडी येथील रेल्वे गेटाखालील परिसरात गेली दोन महिन्यांहून अधिक काळापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यासाठी परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला आहे.
कासारवाडी येथील रेल्वे गेट भागातील पाटणे चाळ, जवळकर चाळ, दगडू मारुती चाळ, जवळकर कॉलनी, केशवनगर चाळ, हिराबाई झोपडपट्टी आदी परिसरात गेली दोन महिन्यापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. आधीच एक दिवसाआड पाणी येते. तेही कमी दाबाने. पाण्याच्या टाक्याही भरल्या जात नाहीत. त्यामुळे आलेले पाणी दोन दिवस कुटुंबाला पुरत नाही, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जुनी पाईपलाईन आहे पण त्याला पाणीच नसल्याने कोरडी आहे. नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे, पण पाणी कमी दाबाने पाणी येत आहे. पाणी सोडले जाते ते गाढ झोपेच्या वेळी. पाण्याची नियोजित वेळ म्हणजे पहाटे साडेचार वाजताची. त्यासाठी येथील नागरिकांना एक तास आधीच उठून जागे रहावे लागते. पाणी आले तर ठीक नाही तर कधी कधी अख्खी रात्र येथील नागरिकांना जागूनसुद्धा पाणी येत नसल्याने पाणीपुरवठा विभागावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी नियोजित पाण्याच्या वेळेत पाणी न सोडता पाण्याच्या टाकीवरील कर्मचारी आपल्या मनमानी पद्धतीने सकाळी सहा वाजता पाणी सोडले तेही कमी दाबाने. याचा नाहक त्रास नागरिकांनी आणखी किती दिवस सहन करायचा हे एकदा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगून तरी टाकावे. कुणाच्या सांगण्यावरून पाण्याच्या टाकीवरील कर्मचारी पाण्याची अनियोजित वेळ ठरवतात. अधिकारी याकडे का दुर्लक्ष करीत आहेत, असा सवालही येथील नागरिकांनी केला.
पंधरा दिवसांपूर्वी कासारवाडी रेल्वे गेट खाली मंत्री चंद्रकांत पाटील येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला अचानक समजताच अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी अकरा वाजताच येथील परिसराला योग्य तऱ्हेने पाणी सोडले. या वेळी पाण्याला प्रेशर होते. दोन तास पाणी सोडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. म्हणजे मंत्री आले की कोणतीही तक्रार नको असे काही आहे का? इतर वेळीच का पाणी प्रेशरणे सोडण्यात येत नाही. असाही प्रश्न करण्यात येत आहे.
मी नुकताच या ठिकाणी पदावर आलो आहे. याबाबत संबंधित अधिकारी दाते, पावरा यांचेशी चर्चा करून माहिती घेतो. उद्यापासून वेळेचे योग्य नियोजन करून या परिसरातील नागरिकांना पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल. या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.सागर पाटील, अभियंता