पिंपळे गुरव: कासारवाडी येथील विकासनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असून, आजतागायत ते पूर्ण होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी 15 एप्रिल 2025 रोजी वर्क ऑर्डर दिली होती. प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था पाहता ही वर्क ऑर्डर कागदावरच धूळखात पडून असल्याचे संतापजनक चित्र दिसून येत आहे.
अपघाताची भीती
कामाच्या नावाखाली रस्ता अक्षरशः खोदून ठेवण्यात आला असून, एम.एस.सी.बी. आणि पाणीपुरवठ्याच्या कामामुळे रस्ता करण्यास वेळ लागत असल्याचे कारण संबंधितांकडून दिले जात आहे. मात्र, हे कारण पुढे करून नागरिकांना हालअपेष्टा सहन करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर सर्वत्र माती, दगड व बांधकामाचा मलबा विखुरलेला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांची दररोज कसोटी लागत असून, लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक व महिलांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. घसरून पडणे वाहन अडखळणे अपघात होणे हे नित्याचे झाले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
आश्चर्याची बाब म्हणजे ठेकेदाराने काम सुरू केल्यानंतर कोणतीही सुरक्षाव्यवस्था केली आहे. धोक्याचे सूचना फलकही लावले आहेत. अर्धवट काम सोडून परिसर नागरिकांच्या नशिबी टाकण्यात आल्याचे विदारक चित्र दिसत आहे. काम सुरू आहे, या सबबीखाली जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू असून प्रशासन, ठेकेदार आणि संबंधित विभागांची बेपर्वाई यामुळे समोर आली आहे. तीन महिने उलटूनही रस्ता पूर्ण न होणे म्हणजे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. रस्त्याच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी नेमके काय करत आहेत? एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वाहतूक व्यवस्था विस्कळीत
महत्त्वाचे म्हणजे विकासनगर ही दाट लोकवस्तीची वसाहत असून, कामगारवर्ग, नोकरदार नागरिक, भाजीपाला व किरकोळ व्यावसायिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज टेम्पो, रिक्षा व अन्य वाहने या रस्त्यावरून धावतात. मात्र, सध्याच्या स्थितीत संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली असून, स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांच्या दैनंदिन उपजीविकेवर थेट परिणाम होत आहे.
रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
जर या रस्त्यावर एखादी गंभीर दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? की नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश देऊन प्रकरण थंड बस्त्यात टाकले जाणार, असा उपरोधिक टोमणा स्थानिक नागरिकांकडून लगावला जात आहे.प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महावितरण आणि पाणीपुरवठ्याचे काम समन्वयाने व वेळेत पूर्ण करून रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे
तीन महिने झाले तरी रस्त्याचे काम संपत नाही. दररोज कामावर जायचं म्हणजे मोठा संघर्ष झाला आहे. चालताना पाय घसरून पडण्याची भीती वाटले. इथे एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का ?मुजीब पटेल, स्थानिक नागरिक
महावितरण आणि पाणीपुरवठ्याचे काम रखडले होते. सध्या बऱ्यापैकी काम झालेले आहे. महिनाभरात काम व्यवस्थितरित्या पूर्ण होऊन जाईल.सुनील दांगडे, उपअभियंता स्थापत्य, ह क्षेत्रीय कार्यालय