वल्लभनगर: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका कासारवाडीला बसला असून, परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते आणि भुयारी मार्गात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून तळी निर्माण झाली आहेत. त्यातच रस्त्यांवरील खड्डे, चिखल आणि दगड-मातीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कासारवाडीतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्यांची स्थिती ओळखणे वाहनचालकांसाठी कठीण झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्याखाली असलेले खड्डे दिसत नसल्याने अचानक वाहन खड्ड्यात आदळण्याची किंवा घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रस्त्यावर पसरलेला चिखल आणि दगड-मातीमुळेही वाहने घसरत आहेत.
साचलेल्या पाण्यामुळे वाहतूककोंडी
कासारवाडीवरून पिंपरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर पाण्याची तळी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. परिणामी काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे साचलेले घाण पाणी व चिखल पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.
भुयारी मार्ग जलमय
कासारवाडीतील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने भुयारी मार्गातून वाहतूक करताना अडचणी निर्माण होत आहेत.
पाणी उपसा अन् खड्डे बुजविण्याची मागणी
साचलेल्या पाण्याचा तातडीने उपसा करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा. तसेच धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत आणि भुयारी मार्गातील पाणी काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी कासारवाडीतील नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासनाने केवळ पावसाळ्यापूर्वीच्या कामांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
नालेसफाईच्या दाव्यांचे पावसाने काढले वाभाडे
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पाणी निचऱ्याची कामे पूर्ण केल्याचा महापालिका प्रशासनाकडून दावा केला जातो. मात्र, सलग पावसामुळे कासारवाडीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पाणी निचऱ्याची कामे झाल्याचे सांगितले जाते. मात्र, पाऊस पडला की कासारवाडीतील रस्त्यांवर पाणीच पाणी असते आणि खड्डेही पाण्याखाली जातात त्यामुळे दुचाकी चालवताना जीव मुठीत धरावा लागतो. प्रशासनाने केवळ तात्पुरती उपाययोजना न करता पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.माऊली थोरात, माजी नगरसेवक.